वाढवणा बु़ : स्वातंत्र्यदिनी येथे आयोजित ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदावरून दोन गटात वाद निर्माण झाला़ पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तात्पुरत्या स्वरूपात हा वाद निवळला़ गोंधळामुळे ही ग्रामसभा पुन्हा शुक्रवारी आयोजित करण्यात येणार आहे़ गावातील तंटे मिटविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती आहे़ मात्र अध्यक्षपदावरूनच वाद निर्माण झाल्याने जोरदार चर्चा सुरु आहे़ उदगीर तालुक्यातील वाढवणा बु़ येथे शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच माधव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पशुवैद्यकीय दवाखान्याच्या प्रांगणात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती़ निरीक्षक म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एच़पी़सुळे उपस्थित होते़ ग्रामसभेस सुरूवात झाल्यानंतर गैरहजर ग्रामपंचायत सदस्यावर कारवाई करण्याचा ठराव घेण्यात आला़ शासकीय, निमशासकीय कार्यालयातील जे कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यासंदर्भात ठराव घेण्यात येऊन तो वरिष्ठांना कळविण्याचे ठरले़ त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांनी ग्रामसभेस अनुपस्थिती दर्शविली त्यांच्याविरूद्धही ठराव घेण्यात आला़(वार्ताहर)महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदाच्या निवडीचा प्रस्ताव माधव कांबळे यांनी मांडला़ अध्यक्षपदासाठी बबन भांगे व नरसिंग डबेटवार या दोघांचे अर्ज दाखल झाले़ दोन अर्ज आल्याने या निवडीसाठी हात वर करून मतदान घेण्याचे सरपंचांनी सांगितले़ तेव्हा दोन्ही गटाच्या नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली़ घोषणाबाजी सुरु झाल्याने अखेर ग्रामसेवक शिंदे यांनी ही निवड २२ आॅगस्ट रोजी करण्यात येईल, असे जाहीर केले़ त्यामुळे ग्रामसभा आटोपती घ्यावी लागली़ कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मणराव राख व पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता़
तंटामुक्तीवरून तंटा
By admin | Published: August 17, 2014 12:28 AM