औरंगाबाद : इंधनाच्या भाववाढीचा नवा विक्रम बुधवारी नोंदला गेला. पहिल्यांदाच पेट्रोल ९२.३१ रुपये व डिझेल ८२.५७ रुपये प्रतिलिटर झाले. हळूहळू पेट्रोलची किंमत शंभरीकडे जात आहे. यामुळे महागाई आणखी वाढणार असल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. इंधन वितरण करणाऱ्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसी या तीन कंपन्या दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करीत असतात.
मंगळवार (दि. १२) च्या तुलनेत बुधवारी पेट्रोल २५ पैसे, तर डिझेल २६ पैशांनी वधारले. पेट्रोल ९२.३१ रु., डिझेल ८२.५७ रुपये प्रतिलिटरने विकले जात होते. १ जानेवारीला पेट्रोल ९१.५३ रुपये, तर डिझेल ८१.७१ रुपये प्रतिलिटर विक्री केले जात होते; तर ७ जानेवारी रोजी पेट्रोल ९२.०५ रुपये, तर डिझेल ८२.२९ रुपये विकले जात होते. यामुळे आता मालवाहतूक भाडे वाढून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणखी भडकतील व त्याचा आर्थिक फटका सर्वसामान्यांना बसेल.
शहरात मुंबई-पुण्यापेक्षा महाग विकले जातेय इंधनऔरंगाबादपेक्षा मुंबई व पुणे महानगर महाग आहे, असे म्हटले जाते. मात्र, इंधनाच्या बाबतीत तसे नाही. औरंगाबादकरांना महानगराच्या तुलनेत जास्त रक्कम मोजावी लागत आहे. पेट्रोल लिटरमागे १.२४ रुपये ते १.५६ रुपये, तर डिझेल ९७ पैसे ते २.७७ रुपये जास्त देऊन खरेदी करावे लागत आहे. मुंबईत पेट्रोल ९१.०७ रुपये, डिझेल ८१.३४ रुपये; तर पुण्यात पेट्रोल ९०.७५ रुपये, डिझेल ७९.८० रुपये प्रतिलिटर विकत आहे.
मालट्रक मालकांना व्यवसाय बंद करण्याची वेळपहिल्यांदा डिझेलचे भाव ८३ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. मालवाहतुकीवर होणाऱ्या ऐकून खर्चात ८० टक्के खर्च डिझेलवर होतो; तर टोलनाक्याचे दर १५ टक्क्यांनी वाढले आहेत. डिझेलमध्ये भाववाढ झाली तरी करारानुसार कंपन्या मालभाडे वाढविण्यास तयार नाहीत. यामुळे व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे.- फैय्याज खान, अध्यक्ष, औरंगाबाद मालवाहतूक संघटना