औरंगाबाद : रेल्वेस्टेशन परिसरातील निशांत को-ऑपरेटिव्ह बँकेत बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांचा अपहार केल्याच्या गुन्ह्यात दीड वर्षापासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराला वेदांतनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आरोपीविरोधात औरंगाबादसह जालना आणि बीड जिल्ह्यात जबरी चोरी आणि लुटमारीचे १० गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे. सतीश ऊर्फ संतोष बाबूराव नाईक (३१, रा. गुरुजन सोसायटी, रोपळेकर चौक), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार आरोपी सतीश ऊर्फ संतोष नाईकसह ११ आरोपींनी निशांत को-ऑपरेटिव्ह बँकेत बनावट सोने गहाण ठेवून लाखो रुपयांचा अपहार केला होता. हा प्रकार समोर आल्यानंतर आरोपींविरोधात वेदांतनगर ठाण्यात गतवर्षी गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आरोपी पसार झाला होता. दीड वर्षापासून पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र, तो सापडत नव्हता. दरम्यान, तो गुरुजन सोसायटीत राहत असल्याची माहिती खबऱ्याने वेदांतनगर पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद देवकते, हवालदार सचिन संपाळ आणि सनगाळे यांनी वेशांतर करून मंगळवारी त्याला शिताफीने पकडले. आरोपी सतीश ऊर्फ संतोषविरोधात शहरातील सिटीचौक, क्रांतीचौक, सिडको, जिन्सी, जवाहरनगर, सातारा, जालना येथील सदर बाजार ठाणे, तालुका पोलीस ठाणे, बीड येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.