औरंगाबाद : कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना आकारण्यात येणारे क्रीडा, फेस्टिव्हल, उपक्रम, संगणक, मदत निधीसह विविध प्रकारचे शुल्क माफ करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संलग्न महाविद्यालये, विभागांना परिपत्रकाद्वारे बुधवारी कळविला.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली जुलैअखेरीस झालेल्या बैठकीत शुल्क माफीसंदर्भात ठराव घेतला होता. या संदर्भात विद्यापीठ परिसर, उस्मानाबाद उपपरिसर तसेच बीड, उस्मानाबाद, जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयाचे प्राचार्य यांना शैक्षणिक विभागाने बुधवारी परिपत्रक पाठविले आहे. त्यात म्हटल्यानुसार कोरोनामुळे आई, वडील, पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण फी माफ करण्यात आली. अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये व विद्यापीठ विभागातील सर्व अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन, उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगझिन, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि यूथ फेस्टिव्हलचे आकारले जाणारे शुल्क माफ करण्यात आले. प्रयोगशाळा व ग्रंथालय शुल्कामध्ये ५० टक्के सवलत दिली. वसतिगृहाचा वापर करता येत नसल्याने तेही माफ करण्याच्या सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.
परीक्षा न झालेल्या वर्गाचे शुल्क होईल यावर्षीच्या परीक्षांसाठी समायोजितशुल्क पूर्णपणे माफ करण्यात यावे. २०२१-२१ या शैक्षणिक वर्षात ज्या वर्षांच्या परीक्षा झाल्या नाहीत त्या वर्गांचे परीक्षा शुल्क पुढील शैक्षणिक वर्षात समायोजित करण्यात यावे. प्रलंबित शुल्कात ३ ते ४ हप्त्यात भरण्याची सवलत देण्यात यावी. शुल्क थकीत असले तर परीक्षेचा अर्ज करण्यास अडवू नये. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. याची संलग्नित महाविद्यालयांनी दक्षता घ्यावी. असे शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव आय.आर. मंझा यांनी कळविले आहे.