औरंगाबाद : माध्यमिक शाळेत सहशिक्षकाची नोकरी करताना या शिक्षकाने त्याचवेळी साखर कारखान्यातही लिपिकाची पूर्णवेळ नोकरी केली. एवढेच नाही, तर सध्या मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेल्या त्या बहाद्दराने शाळेच्या खात्यावर जमा झालेल्या २ लाख १३ हजार ८६ रुपयांच्या वेतनेत्तर अनुदानाचा अपहार केल्याचे बिंग फुटले आहे. संस्थाचालकांच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैठण तालुक्यातील बोकूड जळगाव येथे साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रामदास नाईक माध्यमिक शाळा गेल्या २८ वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेचे सचिव राजेंद्र गुलाबसिंग जाधव (५३, रा. वसंतनगर, जवाहर कॉलनी) यांचा लहान भाऊ विजेंद्र गुलाबसिंग जाधव यांची १९९२ मध्ये सहशिक्षकपदी नियुक्ती केली. त्यांना १९९७ मध्ये सेवेत कायम करण्यात आले व त्यांच्याकडे मुख्याध्यापकाची पदोन्नती दिली. ते आजपर्यंत ते या शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत.
दरम्यान, विजेंद्र जाधव हे या शाळेत सहशिक्षकपदी नोकरी करीत असताना त्याचवेळी ते (८ जानेवारी १९९३ ते २५ जुलै १९९४) जवळपास १९ महिने फुलंब्री येथील देवगिरी साखर कारखान्यात लेखा विभागात लिपिक पदावरही नोकरी केली आहे. त्यांनी दोन्ही ठिकाणी वेतन उचलून शासनाची फसवणूक केली असल्याची माहिती संस्थाचालकांना समजली. त्यानुसार देवगिरी कारखान्याकडे पत्रव्यवहार करून खातरजमा केली असता त्यात तथ्य आढळले. ते प्रकरण अद्याप तसेच पडून आहे.
दरम्यान, सन २०१८ व २०१९ मध्ये शासनाकडून मिळालेल्या वेतनेत्तर अनुदानाच्या २ लाख १३ हजार ८६ रुपयांचा अपहार केल्याची घटनाही समोर आली. त्यांनी दोन वर्षांपासून शाळेचे लेखापरीक्षण केलेले नाही. यासंदर्भात संस्थेने त्यांना वेळोवेळी नोटीस पाठविली; पण त्यांनी या नोटीस स्वीकारल्या नाही. असे अनेक गैर व्यवहार पुढे येत आहेत. याप्रकरणी संस्थेचे सचिव राजेंद्र जाधव यांनी मुख्याध्यापक विजेंद्र जाधव यांच्याविरुद्ध बिडकीन ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बिडकीन पोलिस करीत आहेत.