औरंगाबाद : गणेश जयंती व वसंतपंचमीला शहरात ४००पेक्षा अधिक लग्नसोहळे पार पडले. कोरोनाची टांगती तलवार डोक्यावर असतानाही पाचशे ते हजार वऱ्हाडी लग्नात सहभागी होत आहेत. सॅनिटायझर लावणे सोडाच पण मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग आदी सर्व नियम धाब्यावर बसवून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी मुख्यमंत्री सतत जनतेला आवाहन करत आहे. अजूनही लग्नसोहळ्यासाठी ५० जणांना परवानगी आहे. पण या नियमाचे कोणीच पालन करताना दिसत नाही. लोकमत प्रतिनिधीने मंगळवारी शहरातील काही मंगल कार्यालये, लॉन्सची पाहणी केली. परवानगी ५० जणांची पण प्रत्यक्षात लग्नात ५०० ते १००० वऱ्हाडी जमल्याचे दिसून आले. कोरोनाची कोणालाच भीती दिसत नव्हती. सर्वच समारंभात १५ ते २० टक्के लोकांनीच मास्क लावल्याचे दिसले. सॅनिटायझरच्या बाटल्या नावालाच ठेवल्या होत्या. फिजिकल डिस्टन्सिंगचा तर फज्जा उडाला होता. शहराबाहेरील बीडबायपास, चिकलठाणा परिसरातील लॉन्स, मंगल कार्यालयात तर नियमाची ऐसी की तैशी करण्यात येत आहे. लग्नाला पूर्वीसारखी प्रचंड गर्दी होत आहे. शेकडो लोक पंगतीत बसत आहेत. मात्र, शहरात काही लग्न सोहळे यास अपवाद ठरले. लग्नाच्या वेगवेगळ्या विधीसाठी आमंत्रितांची विभागणी केल्याचे दिसून आले. मंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार मनपा हद्दीत लहान मोठे ३०० मंगलकार्यालये, लॉन्स आहेत. गणेश जयंती व वसंत पंचमी या दोन दिवसांत ४००पेक्षा अधिक लग्न सोहळे पार पडले.
वऱ्हाडी ऐकत नाहीत
आम्ही मंगल कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारवर सॅनिटायझर ठेवले आहे. अक्षदांसोबत प्रत्येकाला मास्क दिले जात आहे. पण वऱ्हाडी नियम पाळत नाहीत. आम्ही फलकही लावले, कर्मचारी नियम पाळण्याच्या सूचना देतात पण वऱ्हाडी ऐकत नाहीत.
- प्रशांत शेळके, अध्यक्ष, मंगल कार्यालय-लॉन्स असोसिएशन
शहरात पालन, पण...
शहरातील मंगलकार्यालयात मनपा व पोलिसांच्या धाकाने काही प्रमाणात नियम पाळले जात आहे, पण खुल्या मैदानावर, शहराबाहेरील लॉन्सवर नियम धाब्यावर बसविले जात आहेत. नियम पाळण्यासाठी असोसिएशने आवाहन केले आहे.
- विलास कोरडे, सचिव, मंगल कार्यालय-लॉन्स असोसिएशन