औरंगाबाद : आद्यकवी मुकुंदराज यांच्या नावाने अंबाजोगाई शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सात महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या अध्यासन केंद्राच्या कामकाजाला अद्यापही सुरुवात झाली नाही. विद्यापीठ प्रशासनाची अनास्था, एका गटाच्या नियंत्रणाखाली काम करण्याच्या धोरणाचा फटका या अध्यासन केंद्राला बसला आहे.
विद्यापीठाच्या अधिसभेने फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या अधिसभेच्या बैठकीत आद्यकवी मुकुंदराज यांचे मराठी भाषेतील योगदानामुळे अंबाजोगाई येथे अध्यासन केंद्र स्थापन करण्याचा ठराव मंजूर केला होता. यानुसार व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिल्यानंतर आॅगस्ट २०१८ मध्ये अध्यासन केंद्राच्या संचालकपदी मराठीचे अभ्यासक डॉ. मुंजा धोंडगे यांची नियुक्ती केली; परंतु विद्यापीठ प्रशासनाच्या कचखाऊ धोरणामुळे अद्यापही अध्यासन केंद्राच्या कामकाजाला सुुरुवात झालेली नाही.
डॉ. धोंडगे हे परळी तालुक्यातील सिरसाळा येथील महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक असून, विद्यापीठाच्या अधिसभेवर काँग्रेस-राष्ट्रवादीप्रणीत उत्कर्ष पॅनलकडून निवडूनही आलेले आहेत. त्यांची नियुक्ती होताच भाजपप्रणीत विद्यापीठ विकास मंचने त्यावर आक्षेप घेत अंबाजोगाईतील खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांची नियुक्ती करण्यासाठी कुलगुरूंसह प्रशासनावर दबाव टाकण्यात आला. या दबावामुळे अध्यासन केंद्राचे उद्घाटन करण्याचे काम खोळंबले होते.
तसेच हे अध्यासन केंद्र अंबाजोगाईतील कोणत्या महाविद्यालयात सुरू करायचे, त्यावरूनही वाद निर्माण झाले होते. यात उत्कर्ष पॅनल समर्थक यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि मंच समर्थक खोलेश्वर महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयात अध्यासन केंद्र स्थापन होण्यासाठी प्रस्ताव दाखल केले होते. यावर निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठराव मांडण्यात आला. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार शेवटी खोलेश्वर महाविद्यालयात अध्यासन केंद्र स्थापन करावे आणि संचालकपदी डॉ. मुंजा धोंडगे यांचीच नियुक्ती कायम ठेवावी, असा निर्णय घेण्यात आला. अध्यासन केंद्राची स्थापना होऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ७ महिन्यांचा कालावधी उलटल्यामुळे मराठी प्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मार्च महिन्यात होणार उद्धाटन आद्यकवी मुकुंदराज यांच्या नावाने मंजूर केलेल्या अध्यासन केंद्राचे उद्घाटन मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहे. मराठी भाषा दिनाच्या निमित्तानेच उद्घाटन करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, कुलगुरू, मान्यवर पाहुण्यांच्या तारखा न जुळल्यामुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उद्घाटन होईल. त्यास कुलगुरूंनी मंजुरी दिली आहे.- डॉ. मुंजा धोंडगे, संचालक, आद्यकवी मुकुंदराज अध्यासन केंद्र, अंबाजोगाई