राजेश खराडे , बीडकृषी वीजपंप जोडणीसाठी तब्बल ५९ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झालेला असून, त्यापैकी ४८ कोटी ६५ लाख रुपयांच्या कामांच्या निविदा काढल्या ओहत. आतापर्यंत केवळ ११ कोटी रुपयांची कामे झाली असून, उर्वरित निधी अखर्चित आहे. योजनेला केवळ १५ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने हा निधी परतीच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.वीज जोडणीविषयी कंत्राटदारांप्रमाणे अधिकाऱ्यांचीही उदासीनता असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील वीज जोडणीची कामे रखडली आहेत. केवळ आॅनलाईनद्वारेच निविदा वाटप झाली असून, प्रत्यक्षात योजनेच्या अनुषंगाने कामे झालेली नाहीत. कामांचे वाटप होऊनदेखील कंत्राटदारांनी अद्याप कामाला सुरुवातही केलेली नाही. हजारो कोटींची थकबाकी, त्यातच वसुलीचे प्रमाण कमी असूनदेखील बीड विभागाचा इतर जिल्ह्यांप्रमाणेच योजनेत समावेश करण्यात आला होता. असे असूनही अधिकाऱ्यांची कामे करवून घेण्याची मानसिकता नाही. कामे रखडून कृषी पंप वीज जोडणी योजनेचा निधी इतरत्र वळवून कंत्राटदारांबरोबरच अधिकाऱ्यांचाही अर्थपूर्ण हेतू असल्याचे समोर येत आहे. मुख्य अभियंत्यापासून ते महावितरणच्या वायरमनपर्यंतच्या कर्मचाऱ्याने वीज जोडणीच्या कामावर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित होते; मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना याचे सोयरसूतक नसल्याने इतरांचे काय, अशी अवस्था आहे.४८ कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा २५ कंत्राटदारांमध्ये वाटप करण्यात आल्या आहेत; पैकी १७ कंत्राटदारांनी कामाला सुरुवात केली असून, केवळ दहा कंत्राटदारांचे काम सद्य:स्थितीत अंतिम टप्प्यात आहे. अंबाजोगाई विभागातील अनेक कामे रखडली आहेत. (प्रतिनिधी)
योजनेचा निधी परतीच्या मार्गावर
By admin | Published: March 14, 2016 12:07 AM