छत्रपती संभाजीनगर : किराडपुरा भागातील दंगलीत गंभीर जखमी व्यक्तीचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. या मृतदेहाचे न्यायाधिशांच्या उपस्थितीत इन कॅमेरा गुरुवारी मध्यरात्री शवविच्छेदन केले. त्यानंतर काही वेळातच मृतावर मोंढा नाका परिसरातील कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शेख मुनिरोद्दीन शेख मोहियोद्दीन (रा. किराडपुरा) असे जखमी मृताचे नाव आहे. शहरातील किराडपुऱ्यातील राममंदिर परिसरात बुधवारी मध्यरात्रीनंतर दोन गटातील वादावादीचे रुपांतर हाणामारी होऊन मोठ्या संख्येने जमाव जमल्यानंतर तुफान दगडफेक केली. जमाव नियंत्रित होत नसल्यामुळे पोलिसांनी सुरुवातील लाठीहल्ला करून पाहिला. त्यानंतर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तरीही जमाव अधिकच उग्र होत असल्यामुळे शहर पोलिसांनी गोळीबार केला. या घटनेमध्ये शेख मुनिरोद्दीन यांना गोळी लागली होती. जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच गुरुवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
शेख मुनिरोद्दीन यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात दाखल केला. त्याठिकाणी पोलिसांनी तात्काळ शवविच्छेदन करण्याच्या सूचना घाटी प्रशासनाला दिल्या. त्यानुसार न्यायाधीशांच्या उपस्थितीत इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी घाटीत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तसेच घाटीमध्ये मृताचे नातेवाईक, हितचिंतक जमा झाल्यामुळे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली. २.३० वाजता शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर मोंढानाका परिसरातील कब्रस्थानमध्ये पहाटे ५.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.