सिल्लोड : तालुक्यात शासनाच्या रेकॉर्डवर गेल्या दोन महिन्यांत २९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र सिल्लोड येथील कब्रस्थान व स्मशान भूमीत दररोज अनेक लोकांवर अंतिम संस्कार होत आहेत. शुक्रवारी तर जागाच नसल्याने स्मशानभूमीत दोघांवर मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.
शहरात एकमेव असलेल्या स्मशानभूमीत गुरुवारी ४ लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. शुक्रवारी पुन्हा दोन जणांचा मृत्यू झाला. त्यांना जागा नव्हती, यामुळे समोर असलेल्या मोकळ्या पटांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील अनेक नागरिक अजूनही कोरोनाला मानायला तयार नाहीत. अनेक लोक आजारी असूनही तपासणी करत नाहीत. मेडिकलवर जाऊन गोळ्या औषधी घेत आहेत. यामुळे घरातच मरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनासह विविध आजारामुळे किंवा वृद्धापकाळामुळे शहरातील मृत्युदर वाढल्याने स्मशानभूमीत जागा कमी पडत आहे.
चौकट
दुसऱ्या दिवशी सावटावी लागते रक्षा
मृत व्यक्तीची रक्षा तिसऱ्या दिवशी सावटावी लागते. मात्र काही समाजसेवी संघटनांनी नागरिकांना दुसऱ्याच दिवशी रक्षा घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून इतरांवर अंत्यसंस्कार करता येईल. यामुळे तिसऱ्या दिवसाऐवजी आता दुसऱ्या दिवशीच रक्षा सावटण्याची वेळ आली आहे.
फोटो कॅप्शन : सिल्लोड येथील एकमेव असलेल्या स्मशानभूमीत एका ठिकाणी चार लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले दिसत आहे. तर दुसऱ्या छायाचित्रात दोघांवर खुल्या मैदानात अंत्यसंस्कार करताना दिसत आहे.