लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : मुंडे बहीण - भावाने प्रतिष्ठेच्या केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी आठ केंद्रांवर शांततेत मतदान झाले. १८ जागांसाठी ४२ उमेदवार रिंंगणात होते. त्या सर्वांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. ९६.५४ टक्के मतदान झाले असून, सोमवारी मतमोजणी होणार आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे वर्चस्व आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यातून हिसकावण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी सत्ता अबाधित राखण्यासाठी कंबर कसली होती.धनंजय मुंडे यांच्या स्व. पंडितअण्णा मुंडे शेतकरी विकास पॅनल व पंकजा मुंडे यांच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे शेतकरी विकास पॅनल यांचे प्रत्येकी १८ उमेदवार रिंगणात आहेत. यासह सहा अपक्षांनी नशीब आजमावले. दोन्ही गटाकडून शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना आकर्षित करण्याची कुठलीच संधी सोडली नाही.धनंजय मुंडे यांनी काँग्रेसला सोबत घेऊन प्रचार केला. प्रा. टी. पी. मुंडे, संजय दौंड यांनीही प्रचाराची धुरा सांभाळली. दुसरीकडे भाजपकडून खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी नेतृत्व केले. पालकमंत्री पंकजा मुंडे निवडणुकीदरम्यान परळीकडे फिरकल्या नाहीत. दोन्ही गटाच्या नेत्यांनी मतदारांना सहलीवर पाठविले होते. रविवारी मतदानासाठी गटातटाने उमेदवार शहरात दाखल झाले. मतदार कोणाला कौल देतात याची सर्वांना उत्सूकता लागली आहे.रविवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत ८ केंद्रांवर मतदान पार पडले. ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. ग्रामपंचायत व सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात प्रत्येकी ९७ टक्के, हमाल मापाडी मतदारसंघात ९३ व व्यापारी मतदारसंघात ९५ टक्के मतदान झाले. चारही संघात मिळून सरासरी ९६.५४ टक्के मतदान झाले.मतदानानंतर आठही केंद्रांवरील मतपेट्या सील करून परळी येथील जि. प. कन्या शाळेत ठेवण्यात आल्या. तेथे सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
भवितव्य मतपेटीत
By admin | Published: May 14, 2017 10:43 PM