औरंगाबाद : एसटी महामंडळात चालक तथा वाहक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची प्रशिक्षणानंतर नोकरी लटकली आहे. काही जणांचे प्रशिक्षण मार्चमध्ये, काही जणांचे जून महिन्यात पूर्ण झाले आहे. तरीही नोकरीवर घेतले जात नसल्याने आंदोलनाचे ‘स्टिअरिंग’ धरत त्यांनी मंगळवारी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली.
औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागांत राहणारे, तसेच बीड, परभणी, अहमदनगर आदी ठिकाणच्या १०८ उमेदवारांची एसटीत निवड होऊन प्रशिक्षण पूर्ण झाले. मात्र, त्यांची अंतिम चाचणी अद्यापही बाकी आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही आतापर्यंत एसटी महामंडळात सेवेत घेण्याची कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. जालना आणि जळगावसह राज्यातील अन्य भागांत उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. औरंगाबादेतही भरती प्रक्रियेला वेग वाढवून लवकरात लवकर वाहक तथा चालक पदावर नियुक्ती देण्याची मागणी करीत उमेदवारांनी आंदोलन केले. विभाग नियंत्रक अरुण सिया म्हणाले, काही दिवसांपूर्वीच प्रशिक्षण संपले आहे. यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे.
‘लोकमत’कडून पाठपुरावा
एसटी महामंडळाने २०१९ मध्ये चालक तथा वाहक पदाची भरती प्रक्रिया राबविली. औरंगाबाद विभागात २४० जागांसाठी ही भरती प्रक्रिया झाली; परंतु कोरोनामुळे अनेकांचे प्रशिक्षण आणि नियुक्ती अडकली. याविषयी ‘लोकमत’ने १३ फेब्रुवारी रोजी ‘एसटी महामंडळाचे प्रशिक्षण लटकले अन् नाेकरीही अधांतरी’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. याविषयी वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून ‘लोकमत’ने पाठपुरावा केला.