माजलगाव: तालुक्याला उसाबाबत पश्चिम महाराष्ट्रापेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतातील ऊस पाण्याअभावी जळत आहेत. माजलगाव तालुक्यातील उसावर अवलंबून असलेल्या १५ ते २० कारखान्याचे भविष्यच जणू काही या विजेच्या लपंडावामुळे अंधारात आले आहे. माजलगाव धरणाची उभारणी झाल्यानंतर धरण क्षेत्रात वाढ झाली. मागील वर्षी सर्वत्र दुष्काळ पडलेला असताना तालुक्यात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर उभे होते. या उसावर माजलगाव येथील दोन कारखान्यांसह मराठवाड्यातील १५ ते २० कारखाने अवलंबून आहेत. गतवर्षी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्यानंतर यावर्षी निसर्गाने चांगली साथ दिली. माजलगाव धरणाच्या पाणीपातळीतही वाढ झाली. या भागातील उसावर अवलंबून असणार्या कारखान्यांना मात्र त्रास सहन करावा लागणार आहे. कारण ज्या भागातून हा ऊस जातो, त्या भागातच विजेचा लपंडाव चालू आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकर्यांच्या शेतातील उभी पिके वाळून जात आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे तर नुकसान होतच आहे, शिवाय या कारखान्यांना माजलगाव तालुक्यातून ऊस मिळणे अवघड झाले आहे. हे ऊस जळून जात असल्याने यावर अवलंबून असणार्या कारखान्यांचे भविष्य या विजेच्या लपंडावामुळे अंधारात आले असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)
कारखान्यांचे भविष्य अंधारात!
By admin | Published: June 02, 2014 12:03 AM