लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भारतीय जनता पक्षाला सध्या चांगले दिवस असल्यामुळे उमेदवारांची लांबलचक यादी गल्ली ते दिल्लीपर्यंत तयार होत आहे. पूर्व मतदारसंघातही पक्षात अनेक जण इच्छुक असून, त्यातूनच क्रांतीचौक येथे सोमवारी रात्री मानापमान नाट्य घडले. कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात आणलेल्या ‘बर्थ डे केक’वर ‘पूर्वचे भावी आमदार’असे लिहून आणल्यामुळे तेथे उपस्थित विद्यमान आ. अतुल सावे यांचा व इतर इच्छुकांचा चेहरा पडला. तो केक आ. सावे यांनी पाहिल्यानंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. आ. सावे व समर्थकांनी काही क्षणातच त्या कार्यक्रमातून काढता पाय घेतला. पूर्व मतदारसंघातून केणेकर यांनी उमेदवारी मिळण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत झुंज दिली; परंतु वरिष्ठ पातळीवरून त्यांना समजाविण्यात आल्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द झाली आणि उमेदवारी सावेंना मिळाली. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात केणेकर आणि सावे समर्थकांमध्ये त्यावेळी हमरीतुमरी झाली होती. तो तणाव आजपर्यंत कायम असल्याचे त्या ‘बर्थ डे के क’मुळे स्पष्ट झाले. बोराळकरांची मध्यस्थीभाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर यांच्या मध्यस्थीमुळे आ. सावे आणि केणेकर यांच्यात वाद झाला नाही. केकवरील ‘भावी आमदार’ हे वाक्य कोरलेले पाहून बोराळकर म्हणाले, सावेजी तुम्ही लोकसभा लढविणार आहात. त्यामुळे पूर्वमधून केणेकर किंवा इतर कुणाला तरी संधी मिळेलच. त्यांनी विनोदाने केलेली ही मध्यस्थी वातावरणात शांतता निर्माण करून गेल्यामुळे दोघांच्या समर्थकांमध्ये वाद झाला नाही.
‘बर्थ डे’ केकवर लिहिले भावी आमदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:01 AM