औरंगाबाद : जी-२० शिखर परिषद प्रथमच भारतात होणार असून, दिल्ली येथे होणाऱ्या या परिषदेचे प्रतिनिधी महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरांसह औरंगाबाद येथील विविध स्थळांना भेटी देणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली.
भारत, इटली व इंडोनेशिया हे तीन देश जी-२० परिषदेचे आयोजन करीत आहेत. फेब्रुवारी २०२३ व मे २०२३ मध्ये जी-२० परिषदेसाठी औरंगाबाद येथे जगभरातील ४० देशांतून सुमारे ५०० प्रतिनिधी भेट देणार आहेत. या अतिमहत्त्वाच्या प्रतिनिधींच्या निवास, सुरक्षा, वाहतूक व इतर अनुषंगिक व्यवस्थेबाबत विभागीय आयुक्तांनी संबंधितांना सूचना दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात जी-२० शिखर परिषदेच्या नियोजनाकरिता पूर्वतयारी बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. प्रसन्ना, जि. प.चे सीईओ डॉ. नीलेश गटणे, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, सा. बां. चे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे आदी अधिकारी उपस्थित होते.
दोन टप्प्यांत येणार शिष्टमंडळ
जी-२० शिखर परिषदेचे सहभागी प्रतिनिधी ९ व १० फेब्रुवारी २०२३ आणि २२ व २३ मे २०१३ रोजी औरंगाबादला भेट देतील. वेरुळ, अजिंठा लेण्यांनाही भेट देणार असून, येथील पर्यटन व औद्योगिक विकासाला अधिक चालना मिळणे शक्य होणार आहे. प्रतिनिधींच्या स्वागतासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन ठेवण्यासाठी केंद्रेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.