छत्रपती संभाजीनगर : जी-२० परिषदेच्या निमित्ताने विदेशी पाहुण्यांसमोर मोकाट जनावरे, श्वान, वराह दिसू नयेत, म्हणून मनपाच्या पशुसंवर्धन विभागाने विशेष बंदोबस्त केला. मोकाट जनावरांना दंड लावून मालकाला देण्यात आले. ४० पेक्षा अधिक श्वानांना तीन दिवस मनपाचा पाहुणचार मिळणार आहे. बीबी का मकबरा परिसरातील पाच वराह थेट यमसदनी पाठविण्यात आले.
जी-२० परिषदेच्या निमित्ताने तब्बल १०० कोटी रुपये खर्च करून शहर सजविण्यात आले. रस्त्याच्या कडेला आकर्षक फुलांची झाडे लावण्यात आली. ही झाडे बकऱ्या, मोकाट जनावरे रात्री खात असल्याचे निदर्शनास येऊ लागले. महापालिकेचा उद्यान विभाग दररोज नवीन झाडे लावून त्रस्त झाला. शेवटी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात १२१ जनावरे कोंडवाड्यात टाकण्यात आली. १ एप्रिलपासून आतापर्यंत ६९९ मोठी जनावरे, २२२ लहान अशी एकूण ९२१ जनावरे पकडण्यात आली.
त्यांच्याकडून तीन लाख ६२ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. यापुढे संबंधित मालकांची जनावरे मनपाला सापडल्यास थेट फौजदारी कारवाईची सूचनाही देण्यात आली. रविवारी शहरातील मुख्य रस्त्यांवरील तब्बल ४० पेक्षा अधिक श्वानही ताब्यात घेण्यात आले. त्यांची नसबंदी करून १ मार्चला सोडून देण्यात येणार असल्याचे उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांनी सांगितले.
मकबरा, मुकुंदवाडी, चिकलठाणा विमानतळ भागात सर्वात जास्त वराह असल्याची माहिती मिळाली. जी-२० परिषदेच्या निमित्ताने एकही वराह बाहेर दिसता कामा नये, यादृष्टीने शहरातील सर्व वराह मालकांना संबधित पोलिस ठाण्यात बाेलावून कायद्याच्या चौकटीत समज देण्यात आली. क्रांतीचौक, सातारा, बेगमपुरा पोलिस ठाण्यात वराहमालकांवर सात गुन्हेसुद्धा नोंदविण्यात आल्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शाहेद शेख यांनी सांगितले. कायद्याच्या आदेशानुसार पाच वराह मारण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.