छत्रपती संभाजीनगर : जागतिक वारसास्थळ असलेल्या वेरुळ लेणीला मंगळवारी परदेशी पाहुण्यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली. लेणी पाहताना कोणी ‘व्वाॅव...’ म्हणत होते, तर कोणी ‘वंडरफुल...’ म्हणत होता. एवढी भव्य लेणी कशी साकारली, असा प्रश्न काहींनी विचारला.
वेरुळ लेणी येथे आगमन झाल्यानंतर गुलाबपुष्प देऊन आणि फुलांची उधळण करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरातील बौद्ध लेणी आणि बीबी का मकबऱ्यापाठोपाठ वेरुळ लेणीतही पारंपरिक पद्धतीने झालेल्या या स्वागताने प्रत्येकजण सुखावून गेला. वेरुळ लेण्यांची पाहणी करीत कैलास मंदिर आणि कोरलेल्या विविध लेण्या, कलाकुसर आदींचे कौतुकही शिष्टमंडळाने केले. तसेच वेरुळ लेण्या पाहून शिष्टमंडळाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. पाहणीदरम्यान विविध देशांच्या प्रतिनिधींना त्यांच्या भाषेत वेरूळ लेणीबाबत सविस्तर माहिती गाईड्सनी दिली. माहिती ऐकून व कलेची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तत्कालीन कलाकृती निर्मितीबद्दल आश्चर्यही शिष्टमंडळाने व्यक्त केले. जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा प्रशासन, पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदींची यावेळी उपस्थिती होती.
कडेकोट बंदोबस्तशिष्टमंडळाच्या वेरुळ लेणी पाहणी दौऱ्यानिमित्त खुलताबाद ते वेरुळ लेणीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रत्येक वाहनाची आणि पासची तपासणी करूनच वाहन लेणीच्या दिशेने जाऊ दिले जात होते.