औरंगाबाद : जी-२० राष्ट्रसमूहाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी विविध देशांचे दीडशेहून अधिक प्रतिनिधी वूमन-२० या परिषदेसाठी २५ व २६ फेब्रुवारी रात्रीपासून शहरात दाखल होतील. औरंगाबादची आठवण म्हणून पाहुण्यांना खास हिमरू शाल, पद्मपाणी फोटो, बिदरी कलाकृती भेट म्हणून देण्यात येतील.
२७ व २८ फेब्रुवारी रोजी परिषदेत पाहुण्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. परिषदेच्या तयारीचा अंतिम आढावा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतला. जी-२० परिषदेत १९ देश आणि युरोपीय संघांचा समावेश आहे. औरंगाबादेत विविध देशांचे प्रतिनिधी, एनजीओ असे सुमारे १५० वर प्रतिनिधी येतील. पाहुण्यांचे विमानतळावर ढोल-ताशाच्या गजरात व भारतीय परंपरेनुसार स्वागत होईल.
२७ फेब्रुवारीला वंदे मातरम् सभागृहात जी-२० अंतर्गत असलेल्या वूमन -२० या परिषदेचे उद्घाटन होईल. परिषदेच्या अध्यक्षा संध्या कुरेचा असतील. डब्ल्यू २० परिषदेच्या मुख्य समन्वयक धरित्री पटनायक असतील. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परिषदेसाठी उपस्थिती असेल. दि. २८ रोजी जालना रोडवरील हॉटेलमध्ये विविध विषयांवर परिसंवाद होतील. महिला उद्योजकांशी चर्चा, महिला व बालकल्याण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद असे नियोजन असेल.
वेरुळ अभ्यागत केंद्रात गाला डिनरपरिषदेचे नियंत्रण परराष्ट्र मंत्रालयाकडे असून, त्यांच्या सूचनेप्रमाणे नियोजन होत आहे. पाहुणे वेरुळ लेणी तसेच परिसरातील ऐतिहासिक स्थळांना भेट देतील. दि. २७ ला सायंकाळी वेरुळ लेणी परिसरातील अभ्यागत केंद्र येथे पाहुण्यांसाठी गाला डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. पाहुण्यांसाठी दहा ई-बस मागविण्यात आल्या आहेत. त्या सोबतच खास दहा व्हॉल्व्हो बसची व्यवस्था केली आहे. मोठ्या हॉटेल्समध्ये त्यांच्या निवासाची सोय केली आहे. त्याच ठिकाणी उद्योग तसेच महिला बचत गटांचे ३० स्टॉल असतील.
औरंगाबादचे ब्रॅण्डिंग करणारऔरंगाबादेतील उद्योग, पर्यटन क्षेत्राच्या ब्रॅण्डिंगसाठी प्रयत्न होत आहेत. शहर सौंदर्यीकरणाची अन्य कामे पूर्णत्वास गेली आहेत. परिषदेसाठी स्वागत, पास, भेटवस्तू, आरोग्य, वाहतूक व सुरक्षा यासह एकूण १५ समित्या स्थापन केल्या आहेत. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तज्ज्ञांचा समावेश असून, गाभा समिती त्यावर देखरेख करीत आहे.