छत्रपती संभाजीनगर : शहरात जी-२० च्या बैठकांसाठी विविध देशांचे सदस्य आले आहेत. हे सदस्य २७ ते २८ फेब्रुवारीदरम्यान वेरूळ लेणीला भेट देणार आहेत. त्यामुळे २७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजेपासून ते २८ तारखेच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.
या काळात या सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील फेरबदल केले आहेत. ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार वेरूळ लेणी आणि गाव राष्ट्रीय महामार्गावर आहेत. त्यामुळे या महामार्गावरील जड व हलकी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे जी -२० च्या बैठकीसाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या वाहनांची ये- जा करताना घाट रस्त्यातील वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर- दौलताबादमार्गे वेरूळ- कन्नडकडे जाणारी जड व हलकी वाहतूक दौलताबाद टी पॉईंट- कसाबखेडा- वेरूळमार्गे कन्नडकडे जाईल. वेरूळ- खुलताबाद- दौलताबादमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहतूक वेरूळ- कसाबखेडा- दौलबाताद टी पॉईंटवरून छत्रपती संभाजीनगरकडे जाईल.
फुलंब्री- खुलताबाद- वेरूळ मार्गाने जाणारी वाहने फुलंब्री- छत्रपती संभाजीनगर - नगर नाका- दौलताबाद टी पॉईंट- कसाबखेडामार्गे वेरूळकडे जाईल. वेरूळ- खुलताबाद- फुलंब्रीकडे जाणारी वाहतूक वेरूळ- कसाबखेडा- दौलताबाद टी पॉईंटमार्गे छत्रपती संभाजीनगरहून फुलंब्रीकडे जाईल, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. वाहनचालकांनी या वाहतूक बदलाची नोंद घेऊन नियमाचे पालन करावे, असे आवाहन अधीक्षक मनिष कलवानिया यांनी केले आहे.