छत्रपती संभाजीनगर : महिला आर्थिक सक्षमीकरण हाच जी-२० परिषदेंतर्गत वूमन २०चा मुख्य गाभा आहे. जुलै २०२३ अखेरीस महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा अहवाल परिषदेच्या नेतृत्वाकडे सादर करण्यात येईल, अशी माहिती परिषदेच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी परिषदेच्या मुख्य समन्वयक धरित्री पटनायक, पीआयबीच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांची उपस्थिती होती.डॉ. पुरेचा म्हणाल्या, आजवर १० राज्यांतील हजारो महिलांशी चर्चा केली आहे. उत्पादनांचे मार्केट प्रमोशन करावे, महिलांच्या नावे एफडी केल्यास जास्त व्याजदर बँकांनी द्यावा, तसेच मालमत्ता महिलांच्या नावावर असल्यास करसवलत द्यावी. मुलींना आत्मसुरक्षेसाठी पहिलीपासून कराटे, सैन्यभरतीपूर्व प्रशिक्षण मिळावे, असे काही मुद्दे समोर आले आहेत.
मुद्रा लोन, महिलांच्या उत्पादनांचे मार्केटिंग, महिलांचे नेतृत्व आणि विकास यावर परिषदेतील पाच पथके धोरण आणि संवादाचा मसुदा तयार करतील. वूमन २० साठी इंडोनेशियाकडून पदभार स्वीकारल्यापासून भारताने विविध संस्थांसोबत १५ हून अधिक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. भारतातील १० राज्यांमध्ये हजारो महिलांसोबत ४० जन भागीदारी कार्यक्रम आयोजित केले असून, त्यातील एक कार्यक्रम एमजीएममध्ये होणार असल्याचे पटनायक यांनी सांगितले. स्थानिक हिमरू शाल, बिद्री कलेच्या ग्लोबल मार्केटिंगसाठी महिलांना प्लॅटफाॅर्म मिळाला पाहिजे. महिलांना डिजिटल साक्षर होण्यासाठी या परिषदेत धोरण ठरेल. राज्यात महिला मंत्री नाही, यावर डॉ. पुरेचा म्हणाल्या, हा राजकीय मुद्दा आहे; परंतु जी-२० मध्ये इतर खूप महत्त्वाच्या चर्चा होतील.
काय आहे जी-२०?विकसित आणि विकसनशील राष्ट्रांचा गट म्हणजे जी-२० आहे. ९०च्या दशकात या गटाची जर्मनीतील बर्लिनमध्ये स्थापना झाली. त्यानंतर २००८ मध्ये या गटातील राष्ट्रे एकत्रित येण्यास सुरुवात झाली. जगातील ६० टक्के लोकसंख्या जी-२० राष्ट्रांमध्ये राहते. ८५ टक्के जीडीपी राष्ट्रांचा असून, ७५ व्यापार या राष्ट्रांतून होतो. भारताकडे यंदाचे अध्यक्षपद आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे ब्रीद घेऊन देशभर मंथन होत असून, छत्रपती संभाजीनगरमध्ये जी-२० अंतर्गत वूमन २०ची पहिली बैठक येथे होत आहे.
छत्रपती संभाजीनगरनंतर पुढील बैठक कुठे?छत्रपती संभाजीनगरमध्ये २७ व २८ फेब्रुवारी रोजी पहिली बैठक आयोजित केली आहे. त्यानंतर १३-१४ एप्रिल रोजी राजस्थानातील जयपूर येथे आणि १५-१६ जून रोजी तामिळनाडूतील महाबलिपूरम येथे आणखी दोन वूमन २० आंतरराष्ट्रीय संमेलने होतील. छत्रपती संभाजीनगर शहरात डब्ल्यू २० ची पहिली बैठक होत आहे. ‘स्त्रियांच्या नेतृत्वाखालील विकास’ ही पहिल्या बैठकीची संकल्पना आहे. विचारविनिमय करणे आणि एक ठोस धोरण विकसित करणे, हे या बैठकीचे उद्दिष्ट आहे.