- शेख मुनीरछत्रपती संभाजीनगर : २० देशांतील १०० पाहुण्यांच्या उपस्थित पार पडलेल्या जी-२० परिषदेसाठी शहरात आलेले पाहुणे आदरतिथ्याने भारावून गेले आहेत. अनेकांनी आयोजकांकडे व्हिडीओच्या माध्यमातून शहरातील ऐतिहासिक वास्तू, बाजारपेठ, राहण्याची व्यवस्था, सुरक्षा, जेवण आदींविषयी तोंड भरून कौतुक केले. शहरातील नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे भारावून गेल्याची कॉम्पलिमेंट पाहुण्यांनी दिली आहे.
भारताला जी-२० च्या बैठकीचे यजमानपद मिळाले आहे. त्यामुळे देशभर बैठका सुरू आहे. यातील डब्ल्यू- २० च्या दोनदिवसीय परिषदेचे यजमान होण्याचा मान छत्रपती संभाजीनगर शहराला मिळाला. या परिषदेसाठी २० देशांतील तब्बल १०० परदेशी पाहुणे शहरात आले होते. या पाहुण्यांनी परिषदेत सहभागी होताना शहरातील विविध ऐतिहासिक वास्तू पाहिल्या. शहरातील विविध ठिकाणी खरेदीसाठी पाहुण्यांनी भेट दिली. यात त्यांनी साडी, शाल असे अनेक वस्तूंची खरेदी केली. यात एक पाहुणा मोबाइल फोनचे चार्जर घेण्यासाठी निराला बाजार याठिकाणी गेला होता. त्याठिकाणी ४ हजार रुपयांचे चार्जर खरेदी केले. मात्र, त्या दुकानदाराने पैसे घेण्यास नकार दिला. त्या दुकानदाराने परदेशी व्यक्तीस तुम्ही आमचे पाहुणे आहात, त्यामुळे पैसे घेणार नाही, असे बजावले. तरीही परदेशी व्यक्ती पैसे देण्यावर ठाम असताना दुकानदाराने केवळ एक रुपयाचे बिल तयार करून दिले. शहरातील एका मॉलमध्येही पाहुण्यांना खरेदी करताना सुखद अनुभव आला. लेणी, मकबऱ्यासह ऐतिहासिक वास्तूंचा सांभाळ उत्तमपणे केला असल्याचे निरीक्षण पाहुण्यांनी नोंदवले. परिषद संपल्यानंतरही पाहुण्यांनी पुन्हा छत्रपती संभाजीनगरला येण्याचा शब्द दिल्याची माहिती संयोजकांनी दिली.
शहर अतिशय सुंदर आहे. या ठिकाणच्या ऐतिहासिक वास्तू खूप आवडल्या. संयोजकांनी दिलेले जेवण अतिशय उत्तम होते. शहरातील महिलांसोबत साधलेला संवाद अतिशय महत्त्वाचा होता. याच महिला शहराला पुढे घेऊन जातील. शहरात येण्याची संधी मिळाली. मी त्यासाठी भाग्यवान आहे.-आयोडेहे मेगबोपे, नायजेरिया
दख्खनचा ताज हा खूपच सुंदर आहे. आम्ही विद्यापीठ लेण्या पाहण्यासाठी सकाळीच पोहोचलो. त्याठिकाणी उगवता सूर्य पाहता आला. हे दृश्य कायम स्मरणात राहील, असेच होते.-कॅथरीना मिलर, जर्मनी
शहरातील नागरिक अतिशय नम्र आहेत. सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत झालेला संवाद अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्यासोबत बोलताना कोठेही अहंमभाव जाणवला नाही.-एंजल, इंडोनेशिया
शहराचा अभिमान वाटावा, अशी ऐतिहासिक वारसा असणारी स्थळे, वातावरण, निसर्ग लाभलेला आहे. बसमधून फिरताना लोक आपुलकीने पाहत होते, हातवारे करीत होते. लोकांच्या भावाना पाहून पुन्हा परत येण्याची इच्छा झालेली आहे.- फराह अराबे, हॉवर्ड केनेडी स्कूल
राजा-महाराजांसारखे आमचे स्वागत करण्यात आले. आम्हाला घेऊन जाण्यासाठी वाहने, सुरक्षा मोठ्या प्रमाणात तैनात केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात आदरातिथ्य कोठेही झालेले नाही. ते सर्व आम्हाला छत्रपती संभाजीनगर येथे अनुभवयास मिळाले.-गुल्डेन, तुर्कस्थान