नांदेड: ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात गणेश मंडळांच्या मंडपात तसेच घरोघरी श्री गणेशाची प्रतिष्ठापणा उत्साहात करण्यात आली. यंदाचा गणेशोत्सव अकरा दिवसांचा आल्याने गणेश भक्तांच्या आनंदाला पारावार उरला नाही. नाचत-नाचत सवाद्य गणेशमूर्ती डोक्यावर, वाहनांमध्ये नेताना गणेश मंडळांचे कार्यकर्ते दिसत होते.सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत श्री गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात येईल, असे सांगितले गेल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची लगबग दिसून येत होती. काही गणेश भक्तांनी महिनाभरापूर्वी गणेशाची मूर्तीचे बुकींग केली होती. तर काही मंडळांनी आयत्यावेळी गणेश मूर्ती पसंत केली आणि तिची वाजत-गाजत मिरवणूक काढली. बाजारात प्रत्येक जण गणेशाची आकर्षक मूर्ती आपल्याला मिळावी, यासाठी पाहणी करताना दिसून येत होता. बाजारात उंदरावर बसलेला गणपती, सिंहावर बसलेला गणपती, वाघावर बसलेला गणपती, उंदीर जवळ असलेला गणपती विक्रेत्यांनी विक्रीस आणले होते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महागाई आपला हेका कायम ठेवल्याने व्यापारीवर्ग गणेश मूर्तीच्या किमती कमी करण्यासाठी मनाई करत होते. महागाईने कळस गाठल्याने तसेच गणपती तयार करण्यासाठी साहित्यांचे भाव वाढल्याने आम्हाला गणेशाची मूर्ती कमी किमतीत विकणे शक्य नाही. त्यामुळे किमतीमध्ये कोणी कृपया घासघीस करु नये, असे व्यापारी बोलताना दिसत होते. २० रुपयांपासून ५ हजार रुपयांंपर्यंत मूर्ती बाजारात विक्रीसाठी आहेत, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले.आघाडा, धोतऱ्याची फुले, पाने, बेलाची पाने, बेल, मका, केळीची खांब, केळी, सफरचंद, डाळींब, नागेलीची पाने, हरळी (दुर्वा), जाणवे, गणपतीचे वस्त्र, कमळ, केळीची खांबे, केळीची पाने, फूलवाती आदी पूजेचे साहित्य बाजारात विक्रीसाठी आले होते. पण सर्वच साहित्यांचे भाव गगनाला भिडलेले दिसून आले. श्रीनगर, जुना मोंढा, नवीन मोंढा, शिवाजीनगर, वजिराबाद, कलामंदिर, वर्कशॉप, भाग्यनगर, आनंदनगर, तरोडा नाका, होळी, वामननगर, भावसार चौक, पूर्णारोड आदी गजबजलेल्या ठिकाणी विक्रेत्यांनी पूजेचे साहित्य व छोटे-मोठे गणपती विक्रीस ठेवल्याचे दिसून आले.एकंदर गणेश चतुर्थीला बाजारात मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची रेलचेल दिसून आली. (प्रतिनिधी)मक्याचे कणीस, धोतऱ्याच्या फुलांना भावएरव्ही धोतऱ्याच्या फुलांकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. पण गणेश चतुर्थीला फुलाचा मान असल्यामुळे ही फुले दहा रुपयाला एक प्रमाणे विकली गेली. दुसरीकडे मक्याची कणसेही भाव खाऊन गेली. मक्याचे कणीस पंधरा रुपये भाव सांगून दहा रुपयाला विक्रेते देत होते. छोट्या विक्रेत्यांनी पोत्यांशी कणसे व फुले आणलेली दिसून आली.तरोडानाका, श्रीनगर या भागात श्रींच्या मूर्तीची दुकाने थाटण्यात आल्याने या परिसरात गणेश भक्तांची मोठी गर्दी उसळली होती़ लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वच मंडळी आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते़ यावेळी लहान बालकांनी बाप्पांची मूर्ती डोक्यावर घेवून ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष केला़ गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आज शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता़ ठिकठिकाणी पोलिसांचे पथक तैनात असल्याचे आढळून आले़ वाहतुकीला अडथळा होवू नये म्हणून काळजी घेण्यात येत होती़ बाजारात विक्रीसाठी स्कुटीवर स्वार झालेले गणेश, कार्टूनच्या वेषातील बाप्पा भाविकांना आकर्षित करीत होते़
गणपती माझा नाचत आला़
By admin | Published: August 29, 2014 11:46 PM