औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र असलेल्या ‘सत्याचे प्रयोग’ या ग्रंथाची क्रेझ अद्यापही कायम आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच जण या ग्रंथाची खरेदी करीत असल्याची माहिती शहरातील ग्रंथ विक्रेत्यांनी दिली.
महात्मा गांधींनी जीवनात केलेल्या विविध प्रयोगांसह लढ्याचे वर्णन आपल्या आत्मचरित्र असलेल्या ‘सत्याचे प्रयोगात’ केले आहे. यावर्षी अनेक ग्रंथ विक्रेत्यांकडून मागील आठवड्यापासून विद्यार्थी, भाषण देणारे व्याख्याते ग्रंथांची खरेदी करीत आहेत. गांधी भवन येथील ग्रंथालयातून ‘सत्याचे प्रयोग’ सहित इतर गांधी विचारांची २०० पेक्षा अधिक ग्रंथ मागील १५ दिवसांत विक्री झाल्याचे व्यवस्थापक डॉ. मच्छिंद्रनाथ गोर्डे यांनी सांगितले.
औरंगपुऱ्यातील बलवंत वाचनालयातील ग्रंथ प्रदर्शन लावणारे शुभम साहित्याचे संचालक करण ओंबासे म्हणाले, चार दिवसांपासून महात्मा गांधी यांच्या आत्मचरित्रासह त्यांच्या विचारांवरील ग्रंथांची मागणी वाढली आहे. प्रतिदिनी १५ ते २० प्रती विकल्या जात आहेत. साकेत प्रकाशनचे साकेत भांड म्हणाले, सत्याचे प्रयोग या ग्रंथाचा कॉपीराईट संपल्यानंतर चार वर्षांत साकेत प्रकाशनाने ग्रंथाची छपाई करून तब्बल ४० हजारांपेक्षा अधिक ग्रंथांची विक्री केली. बहुतांश वेळी भेटवस्तू देण्यासाठी या ग्रंथाची खरेदी केली जात असल्याचेही भांड यांनी सांगितले.