- सारंग टाकळकर
माकड असलो तरी माकडचेष्टा करण्याची अजिबात इच्छा नाही. गांधीजींच्या तीन माकडांपैकी मी एक. ‘बुरा मत देखो’ म्हणणारा! तुमच्या शहरात आल्यावर आधी ज्यांच्यामुळे माझी नवी ओळख निर्माण झाली त्या महात्म्याच्या दर्शनाला शाहगंज का काय म्हणतात त्या भागात गेलो... पहिलं लक्ष गेलं ते त्या उंच टॉवरकडं आणि त्यातील बंद घड्याळाकडं! म्हटलं, ‘समय यहां रुक गया है...’
बापूंना अभिवादन केलं आणि तडक सुपारी मारुतीच्या दर्शनाला लहानपणी आलो होतो. त्यावेळचं मोठ्ठं झाड कुठं गेलं? झाडांचा विचार झटकून टाकत मारुतीरायाचे दर्शन घेतले आणि निघालो. शहरात आलो तेव्हाच एक विशिष्ट आणि कुबट घाण वास आला होता. मला वाटलं तो तेवढ्यापुरता असेल; पण जसजसं फिरतोय तसा हा वासही माझी सोबत करतोय की, कुठे तर अगदी मळमळायला होतंय आणि हे काय! सगळीकडे कचऱ्याचे ढीग, घोंगावणाऱ्या माशा-डास. ओघळणारे पाणी. अरेच्चा! या नाल्याकाठी तर केवढा हा ढिगारा आणि हे काय चक्क नाल्यातच अर्धा कचरा लोटलाय. नक्की लोकंच टाकत असतील.
मी शहर फिरू लागलो. सगळीकडे कचरा दुर्गंधी. अनेक जागी कचऱ्याचे डोंगर पेटलेले! ‘बुरा मत देखो’ म्हणत मी नजर वळवत होतो. माझी ओळखच ‘बुरा मत देखो’ची असताना बघू तरी कुठे? कारण जिकडे नजर जाईल तिथे वाईटच दिसत होते. खरं तर रस्त्याने चालत जाण्याचा निश्चय होता; पण खड्ड्यांना जणू रस्ते आंदण देऊ केलेले. मुख्य शहरात तर चालणेच शक्य होईना. पुढे रिक्षांनी काबिज केलेले आणि अतिक्रमणांनी गिळलेले चौक. त्यातूनही गाड्या काढून मार्गस्थ होणाऱ्या औरंगाबादकरांचे कौतुक वाटले. क्षणभर यामुळे की, त्यांनाही कशाचे सोयरसुतक नव्हते. सर्रास कुणीही विरुद्ध बाजूने येत होते, सिग्नल्स तोडत होते. शेवटी कसाबसा मुख्य शहरातून बाहेर पडलो, तर मोठ्या प्रमाणात महिला-पुरुषांचा जथा येताना दिसला. हातात रिकामे हांडे. अनेक दिवसांपासून पाणी आले नव्हते म्हणे. तिथेच घोषणा, धक्काबुक्की, मारामाऱ्या! शेवटी सगळंच वाईट दिसतंय म्हटल्यावर मी गपगुमान डोळ्यावर हात ठेवले आणि नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे इमारतींवर उड्या मारत निघालो.
काय काय ऐकू येऊ लागले? कचराकोंडीबद्दल एक गृहिणी वैतागाने कुण्या लोकप्रतिनिधीला बोलत होती. तिची सहनशीलता संपल्याचे आवाजातून जाणवत होते. त्यावर त्या लोकप्रतिनिधीने तिलाच जाब विचारला, ‘तुम्ही कुणाशी बोलताय कळतंय का तुम्हाला?’ तर दुसरीकडे कुणी तरी समांतर समांतर, निरंतर आणि अवांतर बोलताना ऐकू येत होते. तिसरीकडून कचरा टाकू देणार नाहीच्या धमक्या आणि गोळीबाराचेही आवाज आले! मला कळेचना. पुढे तर एका सभागृहातून लाथाबुक्क्या आणि मारामारीचाही आवाज आला. एका ठिकाणी ‘आमचे काय, आमचे काय?’ असे रिंग टोन वाजताना ऐकले. नुसते आवाज ऐकूनच कंटाळलो! बघणारे आणि रोज अनुभवणारे कसे सहन करत असतील हा प्रश्न पडला. या सगळ्या कोलाहलात सतत दिलगिरीचे - माफीचेही शब्द ऐकू येत होते. ते कोण आणि कशासाठी आणि माफी कुणाची, हे मात्र कळलेच नाही.
सगळं काही असं सुरू होतं. त्याचीही सवय होतेय असं वाटत असतानाच कुणी तरी उच्चारलेले ‘तिथे दलाल असल्याने मी येत नाही’ असे वाक्य ऐकले. त्यावर उडालेला गोंधळाचा आवाजही सुरू झाला. मला कळले नाही. मी बंद डोळ्यानेच एकाला विचारले. हे कोण बोलिले बोला... तर तो म्हणाला मनपा आयुक्त बोलले..! पण ते दलाल कुठे आहेत म्हणाले ते काही कळले नाही. मनपात कसे असतील दलाल? मग त्याला आयुक्त जबाबदार नाही असे कसे?
शेवटी ‘जाऊ दे मला काय करायचे त्याचे’ असा औरंगाबादकरांचाच पवित्रा मीही घेतला आणि निघालो; पण आता डोळे कुठे गेल्यावर उघडावे याचे काही आकलन होत नाहीये... कारण शहराबाहेर येतोय तरी दुर्गंधी पिच्छा सोडत नाहीये. शिवाय मनपा हद्द संपत आली तरी रस्ते खड्डेमुक्त नसल्याचेच कानी येऊ लागले आणि ती जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे समजले. शेवटी मी तूर्तास तरी दाट वनराई असलेल्या भागाकडे निघालो. माझ्या मारुतीच्या एका पवित्र रूपाचे दर्शन घ्यावे म्हणून निघालो जय भद्रा! दर्शन घेतले आणि त्याला म्हणालो, ‘मूर्छा आलेल्या लक्ष्मणागत हे शहर झालंय. संजीवनी बुटी लागेल मारुतीराया! आता पर्वत मात्र आणू नकोस. कारण, समस्यांचाच पर्वत मोठा आहे!’
कानावर हात कसे ठेवणार? चला! हात डोळ्यांवर असल्याने अब बुरा देखने का सवालही नही; पण हाय रे देवा. ऐकू तर येणारच की! आता कानावर हात कसे ठेवणार आणि ती तर माझी ओळख नाही... अरे राम..! हरे राम!
(लेखक हे औरंगाबादेतील राजकीय भाष्यकार आहेत.)