औरंगाबाद : शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या आरतीने गणेशोत्सवाला सुरुवात झाली. खा. चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, आ. अतुल सावे, आ. सतिश चव्हाण, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते संस्थान गणपतीची आरती सकाळी ११ वाजता झाली.
सुखकर्ताचे स्वागतासाठी शहरवासीयांनी जय्यत तयारी केली होती. मूर्ती व पूजा व प्रसादाचे साहित्य विक्रीसाठी पहाटेच बाजारपेठे उघडली होती. मूर्ती खरेदीसाठी जशी जिल्हा परिषद मैदान, सेव्हनहिल ते गजाजन मंदिर रस्ता, टिव्ही सेंटर परिसरात मोठी गर्दी होती तशीच शहरातील प्रत्येक चौकात हातगाड्या, स्टॉलवर विक्रीसाठी मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. सकाळी ११ वाजता राजाबाजार येथील ग्रामदैवत संस्थान गणपतीची आरती करुन शहरात ९४ व्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली.
यावेळी आयोजित कार्यक्रमात माजी आ. कल्याण काळे, किशनचंद तनवाणी, अंबादास दानवे, नगरसेवक विकास जैन, मकरंद कुलकर्णी, दयाराम बसैये, गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, अध्यक्ष डी.एन.पाटील, दयाराम बसैये, किशोर तुळसीबागवाले, तनसुख झांबड आदी लोकप्रतिनिधी हजर होते. यावेळी संस्थान गणपती ट्रस्टच्या वार्षिक अहवालाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सर्वांनी गणेशोत्सव नियमाचे पालन करुन, शांतते पण उत्साहात साजरा करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले. संस्थान गणपती ट्रस्टचे प्रफुल्ल मालानी, संतोष चिचाणी, अनिल चव्हाण, सुनिल अजमेरा, कन्हैयालाल शहा,भिकचंद चिचाणी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.