Ganesh Chaturthi 2018 :पैठणमध्ये आहे देशातील एकमेव शनिगणपती मंदिर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 03:18 PM2018-09-13T15:18:44+5:302018-09-13T15:20:20+5:30

परीक्षा घेणारा शनिदेव व सर्व दु:ख दूर करणारा विघ्नहर्ता या दोन्ही देवता एकाच ठिकाणी विराजमान आहेत.

Ganesh Chaturthi 2018: In Paithan, the only Shaniganapati Temple in the country | Ganesh Chaturthi 2018 :पैठणमध्ये आहे देशातील एकमेव शनिगणपती मंदिर  

Ganesh Chaturthi 2018 :पैठणमध्ये आहे देशातील एकमेव शनिगणपती मंदिर  

googlenewsNext

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : साडेसातीच्या काळात जीवनाची कठीण परीक्षा घेणारा शनिदेव व सर्व दु:ख दूर करणारा विघ्नहर्ता या दोन्ही देवता एकाच ठिकाणी विराजमान आहेत. तेही दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणमध्ये. शनिगणपतीचे हे भारतातील एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, गोकुळाष्टमीच्या वेळी संत एकनाथ महाराज कुलाचार याच मंदिरात करीत असत व बाजीराव पेशवे यांनीही येथे दर्शन घेऊन नंतर पालखेडची लढाई जिंकली होती. 

आतील नाथ मंदिराच्या गल्लीतून जाताना रस्त्याच्या कडेला एका बाजूला छोटेशा शनिगणपती मंदिराचे दर्शन घडते. या मंदिराला उत्तर बाजूने एक खिडकी आहे. या खिडकीतून आत पाहिले की, सर्वप्रथम शनिदेवाच्या मूर्तीचे दर्शन घडते. त्यानंतर पश्चिमेच्या मुख्य दरवाजातून गणरायाचेही दर्शन घडते. काळ्या पाषाणातील दीड फुटाची शनिदेवाची मूर्ती व पाठीमागेही काळ्या पाषाणाची साडेतीन फूट बाय तीन फुटाची चतुर्भुज श्रीगणेशाची मूर्ती आहे; मात्र शेंदूर लावल्याने ती शेंदूरवर्णीय झाली आहे. 

गणेश भगवंताला साडेसातीची बाधा होती

येथील पुजारी चंद्रकांत महेशपाठक गुरुजी यांनी सांगितले की, प्रत्यक्षात गणेश भगवंताला साडेसातीची बाधा सुरू होती. मंगलकार्यात आद्यपूजेचा मान गणपतीचा असतो; मात्र श्रीगणेशाला साडेसातीची बाधा सुरू झाली. त्यावेळी शनिदेवाने साडेसातीत आद्यपूजेचा मान मला मिळावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. हा पुराणकथेतील संदर्भ आहे. त्यानुसारच पैठणमध्ये शनिगणपतीचे मंदिर उभे राहिले. येथे पहिले शनिदेवाची पूजा मग गणपतीची पूजा केली जाते. हे मंदिर यादवकालीन आहे. संत एकनाथ महाराज गोकुळाष्टमीच्या वेळी कुलाचार करीत असत, तेव्हा महाराज स्वत: या शनिमंदिरात येऊन कुलाचार करीत. कुलाचाराची महाराजांची परंपरा त्यांचे वंशज गोसावी परिवार पुढे चालवत आहे. देशातील हे एकमेव मंदिर असल्याचा दावाही त्यांनी केला. 

साडेसातीच्या काळात बाजीराव पेशव्यांनी घेतले दर्शन 
चंद्रकांत महेशपाठक गुरुजी म्हणाले की, आयुष्यात एकाही लढाईत न हरलेले बाजीराव पेशवे यांच्या साडेसातीचा काळ सुरू होता, तेव्हा त्यांना लढाईला सामोरे जावे लागले. लढाईला जाण्याआधी पैठण येथील शनिगणपतीचे दर्शन घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला होता. त्यानुसार पेशव्यांनी पैठणला येऊन शनिगणपतीचे दर्शन घेतले व नंतर त्यांनी पालखेडची लढाई जिंकली.

Web Title: Ganesh Chaturthi 2018: In Paithan, the only Shaniganapati Temple in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.