विघ्नहर्त्याचे आज आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 01:04 AM2018-09-13T01:04:06+5:302018-09-13T01:04:23+5:30
तमाम गणेशभक्तांना वर्षभरापासून प्रतीक्षा होती तो दिवस उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. उद्या गुरुवार, दि.१३ सप्टेंबर रोजी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : तमाम गणेशभक्तांना वर्षभरापासून प्रतीक्षा होती तो दिवस उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. उद्या गुरुवार, दि.१३ सप्टेंबर रोजी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. शहरवासी यंदा ९४ वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार आहेत.
जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा ५० टक्के कमी पाऊस पडला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साजरा होत आहे. विघ्नहर्त्याचे आगमन होईल व दुष्काळाचे विघ्न टळेल, अशी मनोकामना सर्व जण करीत आहेत. गणेशमूर्तीच्या स्वागतासाठी शहरवासी सज्ज झाले आहेत. घरोघरी गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. आज बाजारपेठेत पूजेच्या साहित्यापासून ते मूर्तीपर्यंत सर्व खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ दिसून आली. जागोजागी सार्वजनिक गणेश मंडळांचे स्टेज उभारण्यात आले आहेत. पताकालावण्यापासूनची सर्व तयारी मंडळाचे कार्यकर्ते करताना दिसून आले. शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिर येथे सकाळी १०.३० वाजता लोकप्रतिनिधींच्या हस्ते मुख्य आरती करण्यात येईल व त्यानंतर शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात होईल. याठिकाणी वार्षिक अहवालाचे प्रकाशन, त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. गणेश महासंघाच्या वतीने समर्थनगर येथील कार्यालयात सकाळी ११ वाजता, तसेच गजानन महाराज मंदिर चौकातील नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघात दुपारी ४ वाजता श्रीच्या मूर्तीची स्थापना व आरती करण्यात येणार आहे. याशिवाय सिडको-हडको सार्वजनिक महासंघ, छावणी उत्सव समितीच्या वतीने वेगवेगळ्या वेळी गणेशमूर्तीची स्थापना व आरती करण्यात येणार आहे, तर गल्लीत व कॉलनी, सोसायटीमधील गणेश मंडळ रात्री ८ वाजेपर्यंत गणपतीची स्थापना करणार आहेत.