लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अनंत चतुर्दशी ५ सप्टेंबर रोजी ‘बाप्पाला’ निरोप देण्यासाठी गणेश मंडळे सज्ज झाली आहेत. प्रशासकीय यंत्रणेकडूनही गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून हिंगोली शहरातील तीन ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात येणार आहे.२५ आॅगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची उत्साहात स्थापना करण्यात आली. आता वेळ आली आहे, ती बाप्पाला निरोप देण्याची. बाराव्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. गणेश विसर्जन करताना गणेश मंडळांची गैरसोय होऊ नये व शांततेत कार्यक्रम पार पडावेत यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. पोलीस यंत्रणेकडून सीसीटीव्ही कॅमेरे तसेच तगडा पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात असणार आहे. शिवाय चौकाचौकात पोलीस अधिकारी कार्यरत असणार आहेत. पोलीस बंदोबस्ताची तयारी पूर्ण झाली असून लवकरच संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना त्यांच्या जबाबदाºया सोपविण्यात येणार असल्याचे हिंगोली शहर ठाण्याचे पोनि अशोक मैराळ यांनी सांगितले. तर पालिकेचे १७५ कर्मचाºयांना ५ सप्टेंबर रोजी कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना न. प. मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिल्या. पालिका व पोलिस प्रशासनाची विसर्जनासंदर्भात शुक्रवारी बैठक झाली. यावेळी हिंगोली शहरातील विसर्जनाचे नियोजन करण्यात आले. विसर्जनावेळी काही अडचणी निर्माण झाल्यास संबंधित गणेश मंडळाने तत्काळ पालिकेशी संपर्क करण्याचे आवाहन मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी केले.
गणेश विसर्जनाची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 12:47 AM