औरंगाबाद : कोरोनाच्या दोन वर्षानंतर औरंगाबाद शहरात लाडक्या गणरायाचे मोठ्या भक्तिवात आणि जल्लोषात आगमन होत आहे. शहरातील प्रत्येक चौकात गणेश मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. 'गणपती बाप्पा मोरया...' असा जयघोष होत आहे.
शहरातील टीव्ही सेंटर चौक परिसरात गणेश मूर्ती, पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. संपूर्ण कुटूंबासह अनेक जण गणेश मूर्ती खरेदीसाठी येत असल्याचे पहायला मिळत आहे. हीच मूर्ती हवी म्हणून लहान मुले पालकांकडे हट्ट करीत असल्याचेही पहायला मिळत आहेत.
गेली दोन वर्षे कोरोनाचे संकट असल्याने गणेशोत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा करता आला नाही. परंतु आता कोरोनाचे संकट दूर झाले बऱ्यापैकी दूर झाल्याने सर्व सण कुठल्याही निर्बंधाशिवाय साजरे करता येणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये वेगळाच उत्साह संचारला आहे. भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
१६ फुटी बाप्पाचे भव्य आगमन स्वामी विवेकानंदनगर, एन-१२मधील एफ सेक्टर येथील मोरया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या १६ फुटाच्या हडकोच्या राजाच्या श्रींची जाधववाडी चौकातून वाजत-गाजत, भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशाचा पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या हडकोच्या राजाच्या स्वागताला जनसमुह लोटल्याचे पहायला मिळाले.