औरंगाबाद : शहर पोलिसांनी गणेश विसर्जनासाठी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. शहराच्या विविध भागात निघणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकींमध्ये तब्बल ७५३ सार्वजनिक गणेश मंडळ सहभागी होणार आहेत. पोलीस विभागाकडे ८८६ गणेश मंडळांनी गणेश स्थापनेसाठी अर्ज दाखल केले होते.
त्यातील ७५३ मंडळांना शहर पोलिसांनी परवानगी दिलेली आहे. परवागनी असणारी गणेश मंडळेच विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती शहर पोलिसांतर्फे देण्यात आली.अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील गणेश विसर्जनाची मुख्य मिरवणूक, सिडको हडको मिरवणूक, चिकलठाणा, मुकुंदवाडी, नवीन औरंगाबाद, वाळूज महानगर, वाळूज, हर्सूल, दौलताबाद, सातारा, छावणी भागात मिरवणूक निघणार आहे. पोलीस कडक बंदोबस्त ठेवत आहेत. संवेदनशील भागात वॉच टॉवर, उंच इमारतीमधून पोलीस समाजविघातक घटकांवर करडी नजर ठेवणार आहे. त्यासाठी तब्बल २ हजार ७१८ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्याशिवाय राज्य राखीव बलाचे जवान, होमगार्डही सहभागी होणार आहेत.
पोलीस आयुक्तांनी प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळासोबत एक पोलीस कर्मचारी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा कर्मचारी गणेश मंडळ आणि पोलीस प्रशासनात समन्वय साधणार आहे. मुख्य मिरवणूक मार्गात असलेल्या दहा इमारतींवर हालचाली टिपण्यासाठी २१ पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सिडको हडको मिरवणुकीसाठी सहायक पोलीस आयुक्तांच्या देखरेखीत १०१ पोलीस अधिकारी, कर्मचारी असतील. बंदोबस्ताच्या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अन्न पाकिटांची व्यवस्थाही आयुक्तालयातर्फे असेल.