औरंगाबाद : 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...अशा जयघोषात शहरातील गणेश विसर्जनाच्या मिरवणुका ढोल-ताशांच्या गजरात पुढे पुढे सरकत आहे. जागोजागी रस्ते गर्दीने फुलून गेले.
सगळ्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे. बाप्पांसमोर पावली पथके, ढोल-ताशे तालात वाजत असताना मंडळाचे कार्यकर्ते गणेशभक्तांची पावले थिरकत आहेत. गुलाल पुष्पांच्या उधळणीसोबत पावसाची मुक्त उधळण सुरू होत आहे. गणरायाला निरोप देताना जाणून वरुणराजा जलाभिषेक करीत आहे.
शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसह हजारो गणेश भक्तांनी गणरायाला निरोप देत आहेत. ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या गणेशरथाने विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. शहरातील टीव्ही सेंटर, हर्सूल, मुकुंदवाडी, चिकलठाणा, गजानन महाराज मंदिर चौक, सातारा, वाळूज या भागातही उत्साहात विसर्जन मिरवणुका निघत आहेत. विसर्जन मिरवणुकीत ठिकठिकाणी रेवड्या, राजगिर्याचे लाडू, भात, साबुदाणा खिचडी, साखर खोबर्याचे वाटप केले जात आहे.
ढोल ताशांबरोबर देवा हो देवा, मुंगळा, अरे दिवानो , ओ शेट...अशा एकापेक्षा एक सरस गाण्यांच्या तलावर गणेशभक्त थिरकत आहेत.