औरंगाबाद : कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा सप्टेंबर महिन्यात होणारा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने शासनाकडून मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. त्यामुळे यंदाही जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी साेमवारी आदेश जारी केले आहेत.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच केंद्रीय कृती गटाने तिसरी लाट येत्या काही दिवसांत येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतांना काय करावे, काय करू नये याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार निर्बंध कायम राहणार असून गणेशोत्सवात कोणतीही शिथिलता देता येणार नाही.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आदेशात म्हटले आहे, गणेशोत्सव मंडळांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या परवानगीविना सार्वजनिक गणपतीची स्थापना करू नये. घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी. सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपतीकरीता २ फूटांची मूर्ती असावी. श्रींच्या मूर्तीचे घरीच विसर्जन करावे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वर्गणीबाबत आग्रह धरू नये. सास्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य शिबिरे घ्यावीत. गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी करू नये. सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करू नये. तसेच महाप्रसाद, भंडाऱ्याचे आयोजन करू नये. श्री गणेशाच्या आगमन व विसर्जनप्रसंगी मिरवणुका काढू नये.
जिल्ह्यातील मूर्तिकारांवर संकट
जिल्ह्यात साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आदेश शासन परिपत्रकानुसार देण्यात आले असून या आदेशांमुळे मूर्तिकारांवर संकट आले आहे. गेल्यावर्षीदेखील कोरोनामुळे गणेशोत्सवावर निर्बंध होते. यंदाही तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उत्सवावर निर्बंध लावण्यात आले आहेत. निर्बंधामुळे मागील वर्षी गणपतीच्या मोठ्या मूर्ती खूप शिल्लक राहिल्या होत्या.