औरंगाबाद : राज्यभरातील विविध सराफा दुकानांत जाऊन खरेदीचा बहाणा करीत हातचलाखीने दागिने पळविणाऱ्या बीडच्या एका टोळीला औरंगाबाद गुन्हे शाखा व वाशीम पोलिसांच्या पथकाने काल सिडको परिसरात अटक केली.आरोपींमध्ये शीतल सदाशिव पवार (२५), नितीन भास्करराव पोपळघट (रा. लोहार गल्ली, गेवराई, बीड), शकूनबाई भुराजी शिंदे (३५, रा. संजयनगर, गेवराई) व कावेरी अजित पांडे (३०, रा.लोहार गल्ली, गेवराई, बीड) यांचा समावेश आहे. या आरोपींच्या ताब्यातून एक कारही जप्त करण्यात आली.कारवाईबाबत माहिती देताना गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, वरील आरोपींची आपल्या काही साथीदारांच्या मदतीने वाशीम येथे एका सराफा दुकानात खरेदीचा बहाणा करून लाखो रुपयांचा ऐवज हातचलाखीने पळविला होता. या प्रकरणी वाशीम शहर ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. याच टोळीने सिंधुदुर्गमध्येही नुकताच अशाच पद्धतीचा गुन्हा केला. त्यातील काही आरोपींना सिंधुदुर्गमध्ये अटक करण्यात आली आहे. वाशीम पोलीस या टोळीतील उर्वरित आरोपींच्या मागावर होते. हे आरोपी एका कारने औरंगाबादेत आल्याची माहिती काल वाशीम पोलिसांना मिळाली. लगेच वाशीमचे पथक औरंगाबादेत आले. औरंगाबाद गुन्हे शाखा पोलिसांच्या मदतीने या पथकाने आरोपींचा माग काढला. तेव्हा आरोपी सिडको एन-१ भागात एका सराफा दुकानाजवळ फिरत असल्याची माहिती मिळाली.लगेच गुन्हे शाखा आणि वाशीम पोलिसांनी तेथे जाऊन ही कार पकडली. त्यात शीतल पवार, कावेरी पांडे, शकुनबाई शिंदे व नितीन पोपळघट हे आरोपी पोलिसांना सापडले. विशेष म्हणजे वाशीम येथे दुकानात चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे आरोपी कैद झालेले आहेत. या चारही आरोपींना अटक करण्यात आली.
सराफा दुकानांतून हातचलाखीने दागिने पळविणारी टोळी जेरबंद
By admin | Published: September 20, 2014 12:16 AM