छत्रपती संभाजीनगर : कारागृहातल्या टोळीयुद्धातून अटकेतील कैद्यांनी तपासणी करणाऱ्या तुरुंग अधिकाऱ्यांवरच हल्ला चढवला. २७ ऑगस्ट रोजी सकाळी हर्सूल कारागृहात ही घटना घडली. खुनातला आरोपी शाहरूख अकबर शेख याने वाद पेटवून अधिकारी, कर्मचाऱ्यांवर इतर गुन्हेगारांना धिंगाण्यासाठी चिथावणी दिली. वेळीच बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांनी धाव घेतल्याने कारागृहातील अनुचित प्रकार टळला. याप्रकरणी शाहरूखसह सतीश काळुराम खंदारे, गजेंद्र तुळशीराम मोरे, निखिल भाऊसाहेब गरड, किरण सुनील साळवे, ऋषिकेश रवींद्र तनपुरे, अनिल शिवाजी गडवे, अनिकेत महेंद्र दाभाडे, राज नामदेव जाधव यांच्यावर हर्सूल पोलिस ठाण्यात नऊ गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तुरुंगाधिकारी प्रवीण मोडकर शुक्रवारी कारागृहात कर्तव्यावर होते. सात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकासह त्यांनी बॅरेकची तपासणी सुरू केली. झाडाझडती सुरू असताना ८ वाजता बॅरेक क्रमांक पाचमध्ये बद्रीनाथ शिंदेने प्रमुख सुरक्षा अधिकारी सतीश हिरेकर यांना, शाहरूख झडतीची टीप देण्यावरून मला मारहाण करतो. मी कोल्हापूरला खून करून आलोय, तुझाही करेल, अशी धमकी देतो, असे सांगितले. हिरेकर यांनी तत्काळ शाहरूखला चौकशीसाठी बोलावले. तेव्हा शाहरूखने त्यांच्यासमोर शिंदेला मारहाण सुरू केली. शिंदेनेदेखील शाहरूखवर हल्ला चढवला. तुरुंग कर्मचाऱ्यांनी त्यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाहरूखने मोडकर यांना खाली पाडून मारहाण सुरू केली. इतर कैदी बॅरेकचा दरवाजा जोरात ढकलून बाहेर आले. त्यांनी आरडाओरड सुरू केली. खंदारेने शिपाई सुमंत मोराळे यांच्यावर हल्ला चढवला.
म्हणून कारागृहातला अनुचित प्रकार टळलाअचानक कैद्यांचा धिंगाणा, आरडाओरड सुरू झाल्याने तुरुंग अधिकारी, कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. मोरे याने वादात उडी टाकत इतर गुन्हेगारांना अधिकाऱ्यांना मारण्यासाठी चिथावणी दिली. ऋषिकेश तनपुरे याने शिवीगाळ व मारहाण केली. अधिकाऱ्यांनाच त्यांनी तुरुंगात मारून टाकण्याची धमकी दिली. इतर सुरक्षेवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण केल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली व अनुचित प्रकार टळला. मात्र यातली ऋषिकेश तनपुरे याने यापूर्वीदेखील न्यायालयात बीड, सिगारेट घेऊन जाण्यावरून वाद घालत मारहाण केली होती. ९ ऑगस्ट, २०२१ रोजी पुंडलिकनगरमध्ये आकाश राजपूतची हत्या केली होती. त्यात तो अटकेत आहे.