छत्रपती संभाजीनगर : 'मी या एरीयाचा दादा आहे, पुन्हा येथे दिसू नको' असे म्हणत दोन वेळा कारागृहाची हवा खाऊन नुकताच बाहेर आलेल्या एका गुंडाने हॉटेलमध्ये धिंगाणा घातला. एका तरुणावर चाकू खुपसून खुनाचा प्रयत्न करत अंगावर बीयरच्या बाटल्या फोडल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी कुख्यात गुन्हेगार अजय ठाकूर, अरुण शिंगारे व संतोष खरे यांच्यावर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साताऱ्यात राहणारा २५ वर्षीय लक्ष्मण कांबळे बीडबायपास येथील हॉटेल टिल्लुटचला जेवायला गेला होता. त्याच हॉटेलमध्ये अजयसह अन्य दोन साथीदार तेथेच होते. परंतू अजयने अचानक लक्ष्मणच्या दिशेने जात धमकावणे सुरू केले. मी साताऱ्याचा दादा आहे, सातारा परिसरात दिसू नका, मी अट्टल गुन्हेगार आहे, माझ्या नादी लागायचे नाही, असे म्हणत धमकावले. वाद वाढू नये म्हणून लक्ष्मणने जेवण आटपते घेऊन हॉटेल सोडले. मात्र, तिघांनी अचानक पाठीमागून जात कॉलर पकडून त्याला हाताचापटाने मारहाण सुरू केली. अजयने 'आजच तुझा गेम करतो', असे म्हणत चाकूने वार केले. त्यानंतर अंगावर बीयरच्या बाटल्या फोडल्या.
मित्रांनी साथ सोडून पळ काढलालक्ष्मण दोन मित्रांसह हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. मात्र, अजयने हल्ला केल्यानंतर लक्ष्मणच्या मित्रांनी मात्र त्याला सोडून पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार करुन लक्ष्मणने सातारा पोलिसांकडे तक्रार दिली. अजय ठाकूर काही महिन्यांपूर्वीच एमपीडीएच्या कारवाईत वर्षभर कारागृहात राहून आला. शिवाय, त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. गारखेड्यातील स्वयंघोषित एका गुंडासोबत त्याची मैत्री होती. आता पुन्हा त्याने डोके वर काढल्याची चर्चा सातारा परिसरात आहे.