औरंगाबाद : पावसामुळे सडणारा कचरा व त्याच्या प्रचंड दुर्गंधीने त्रस्त नागरिकांचा संयम ढळू लागताच सोमवारी मध्यरात्रीपासून महापालिकेची यंत्रणा कामाला लागली. शहरातील प्रमुख रस्ते व चौकांमध्ये मागील दोन महिन्यांपासून साचलेला तब्बल दहा हजार मेट्रिक टन कचरा उचलण्यास सुरुवात झाली. मंगळवारी दिवसभरात २०० ते २५० टन कचरा उचलण्यात आल्याचा दावा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आला; पण हा कचरा नेमका कोठे नेण्यात येत आहे, यावर त्यांनी मौन बाळगले.
महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एप्रिल महिन्यात शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ३० एप्रिलपर्यंत शहरातील कचरा उचलून हर्सूल, चिकलठाणा, पडेगाव आदी भागात नेऊन टाकण्यात आला होता. १ मेपासून शहरातील कचरा उचलणे बंद होते. त्यामुळे जिकडे तिकडे कचऱ्याचे डोंगरच उभे राहिले.
मध्यरात्रीपासून सुरुवातशहरातील प्रमुख रस्त्यांवरील कचरा सोमवारी मध्यरात्रीपासून उचलणे सुरू होते. मध्यरात्री २.३० वाजेपर्यंत कचरा उचलून अज्ञातस्थळी रवाना करण्यात आला. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी सकाळी मध्यवर्ती जकात नाका येथे पाहणी केली. त्यानंतर पुन्हा कचरा उचलणे सुरू झाले. औरंगपुरा, किलेअर्क, पदमपुरा, समर्थनगर आदी भागातील किमान २०० ते २५० टन कचरा उचलण्यात आला. हा कचरा ३० पेक्षा अधिक वाहनांमध्ये भरून पाठविला. हा कचरा टाकण्यासाठी महापालिकेने दोन स्थळांचा शोध घेतला आहे. कचरा कुठे टाकतोय हे सांगितल्यावर पंचक्रोशीतील नागरिक विरोध करतात. त्यामुळे आम्ही ही बाब गोपनीय ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे महापौरांनी नमूद केले.
काहीही करा, पण कचऱ्यावर प्रक्रिया करून द्यामहापालिकेने जंगजंग पछाडल्यानंतरही नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करून द्यायला तयार नाहीत. घंटागाडी पाठवूनही नागरिक रस्त्यावर मिक्स कचरा टाकतच आहेत. मागील दोन महिन्यांपासून कचरा न उचलल्याने २० ते २५ हजार मेट्रिक टन कचरा ठिकठिकाणी पडून आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत. सोमवारी कंपन्या आपला डेमो सादर करतील. त्यानंतर लगेच कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे तात्पुरते काम देण्यात येणार आहे. १६ फेब्रुवारीपासून शहरात कचराकोंडी सुरू आहे. साडेचार महिन्यांत महापालिकेने कचरा प्रश्नावर ठोस निर्णयच घेतला नाही.
आणीबाणीमुळे घेतला निर्णयकचरा प्रश्नात औरंगाबादकर कमालीचे संतप्त होत असल्याचे लक्षात येताच प्रशासनाने मंगळवारी तातडीने विविध कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्याचा निर्णय घेतला. मध्यवर्ती जकात नाका, चिकलठाणा, हर्सूल येथे पडून असलेल्या कचऱ्यावर त्वरित कंपन्यांनी प्रक्रिया करून द्यावी. दररोज निघणाऱ्या कचऱ्यावरही प्रक्रिया करण्याचे दायित्व कंपन्यांवर सोपविण्यात येणार आहे.
जकात नाक्यावर डेमोसोमवार ९ जुलै रोजी देशभरातील कंपन्यांना डेमो सादर करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. सध्या पडून असलेल्या मिक्स कचऱ्यावर प्रक्रिया करून दाखवावी, अशी विनंती करण्यात येणार आहे. चांगला डेमो असलेल्या कंपनीला जागेवरच काम देण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.