वसमत: नागरी सुविधांकडे मुख्याधिकारी लक्ष देत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी वसमत न.प.चे मुख्याधिकारी प्रचंडराव यांच्या कॅबीनसह स्वच्छता विभागाच्या अभियंत्यांची कॅबीनमध्येही कचऱ्याचे ढिगारे आणून टाकले. या प्रकाराने एकच खळबळ उडाली. सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांच्या पुढाकारानेच हे आंदोलन झाले, हे विशेष. वसमत येथील शास्त्रीनगर, बहिर्जीनगर, ईपकलवारनगर, मयूरनगर, गणेशनगर या प्रभागात सांडपाणी वाहून जाण्याची समस्या आहे. गटारांचे काम न झाल्याने जागोजागी पाणी तुंबून राहते. दुर्गंधी व रोगराई पसरते. पावसामुळे तर रस्त्याने ये-जा करता येणेही अवघड झाले आहे. पाणी तुंबल्याने नागरिकांच्या घरात नाल्यांचे पाणी शिरत असल्याच्याही तक्रारी आहेत. या प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक व वारंवार करतात. मात्र कोणी लक्ष देत नाहीत. मुख्याधिकाऱ्यांनी तर वसमतमध्ये कधी पाऊल टाकले नसल्याने त्यांना रस्ते व शहराच्या समस्यांही माहीत नाहीत.या प्रकरासंदर्भात नगरसेवक राजेश पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सांडपाण्याची विल्हेवाट लावा. अन्यथा नगरपालिकेत कचरा आणून टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी शनिवारी दुपारी नगरसेवक राजेश पवार व परिसरातील नागरिकांनी ट्रॅक्टरमध्ये कचरा घेऊन न.प.गाठली. नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर ट्रॅक्टर आडवे लावून नागरिकांनी कचरा टोपले भरभरून मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या केबीनमध्ये भरून टाकला. त्यावेळी मुख्याधिकारी केबीनमध्ये हजर नव्हते. स्वच्छता विभागाचे अभियंता बळवंते यांचीही केबीन कचऱ्याने भरून टाकली. आज न.प.कार्यालयात सर्वत्र कचराच कचरा झालेला पहावयास मिळाला. या प्रकाराने शहरात प्रचंड खळबळ उडवून दिली. (वार्ताहर)
पालिकेत आणून टाकला कचरा
By admin | Published: October 02, 2016 1:11 AM