लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेत एकही प्रकल्प यशस्वी होत नाही. येथील राजकीय मंडळी कोणालाही काम करूच देत नाही, अशी कुख्याती सर्वदूर पसरली आहे. कचरा संकलनासाठी महापालिकेने काढलेली सर्वात मोठी निविदा घेण्यास एकही कंपनी तयार नाही. त्यामुळे महापालिकेवर तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्याची नामुष्की ओढावली आहे. २४ आॅगस्टपर्यंत एका तरी कंपनीने निविदा भरावी, अशी प्रार्थना प्रशासनाकडून करण्यात येत आहे.शहरात १६ फेब्रुवारीपासून कचराकोंडी झाली आहे. कचºयाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून राज्य शासनाने सढळ हाताने ९० कोटी रुपये मनपाला दिले आहेत. शहरातील कचरा संकलनासाठी कंत्राटदार नेमण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दोन महिन्यांपूर्वी यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. एकाही कंत्राटदाराने ही निविदा भरलेली नाही. शनिवारी महापालिकेला तिस-यांदा निविदा प्रसिद्ध करावी लागली.प्रत्येक घरातून कचरा जमा करण्याचे काम या कंत्राटदाराला देण्यात येईल. सध्या मनपा ३५० रिक्षा लावून कचरा संकलित करीत आहे. ११५ वॉर्डांतील प्रत्येक घरातील कचरा जमा करण्याचे दायित्व कंत्राटदारावर राहणार आहे. नागरिकांकडून महापालिका दररोज एक रुपयाप्रमाणे महिना ३० रुपये या कामाचे घेणार आहे. इंदूर मनपा २ रुपये एका मालमत्ताधारकांकडून वसूल करते. या अभिनव पद्धतीतून मनपाला दरवर्षी १५ कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षा आहे.प्रकल्प अयशस्वी झाल्यास...२०१० मध्ये महापालिकेने हैदराबाद येथील रॅमकी कंपनीला शहरातील कचरा उचलण्याचे काम दिले होते. दरवर्षी फक्त १० कोटी रुपये देण्याचा करार झाला होता. कंपनीला हे काम परवडत नव्हते. तरीही कंपनी कोट्यवधी रुपयांची वाहने आणून काम करीत होती.महापालिकेने या कंपनीची अक्षरश: हकालपट्टी केली. त्यामुळे आता पुन्हा महापालिकेत काम करण्यास देशभरातील मोठ्या कंपन्या तयार नाहीत. मनपा प्रशासनाने काही मोठ्या कंपन्यांशी संपर्क साधून निविदा भरा, अशी विनंती केली आहे. मनपाच्या या विनंतीला अद्याप तरी प्रतिसाद मिळालेला नाही.कोट्यवधींची गुंतवणूकशहरातील तब्बल ३ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांकडून दररोज कचरा संकलनासाठीकंत्राटदाराला कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. प्रत्येक वॉर्डात ४ पेक्षा अधिक रिक्षा, अत्याधुनिक वाहने आणावी लागतील. जमा झालेला ओला व सुका कचरा चिकलठाणा आणि पडेगाव येथील प्रक्रिया केंद्रावर नेऊन टाकण्याचे काम कंत्राटदाराला करावे लागणार आहे.
कचरा संकलनास कंपन्या अनुत्सुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:52 AM