लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीला लागूनच ऐतिहासिक टाऊन हॉल आहे. या इमारतीच्या परिसरात सुका कचरा दररोज जमा करण्यात येत आहे. तब्बल दीड महिन्यानंतर एमआयएम नगरसेवकांना ही बाब माहीत पडली. त्यांनी सोमवारी सायंकाळी वॉर्ड अ चे अधिकारी भालचंद्र पैठणे यांच्या कक्षात आणि खुर्चीवर हा कचरा नेऊन ठेवला. कचरा आमच्या घरात आणून टाका; पण टाऊन हॉल येथे कचरा आम्ही सहन करणार नाही, अशी भूमिका एमआयएम नगरसेवकांनी मांडली.शहरात मागील ४६ दिवसांपासून कचरा कोंडी सुरू आहे. एमआयएमचे नगरसेवक ज्या वॉर्डातून निवडून आले आहेत, त्या वॉर्डांमध्ये सर्वाधिक कच-याचे डोंगर दिसून येत आहेत. झोन १, २ आणि ३ मध्ये नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करून देत नाहीत. त्यामुळे ठिकठिकाणी कचºयाचे डोंगर तयार होत आहेत. कचरा प्रश्नाबाबत एमआयएम नगरसेवक अजिबात सहकार्य करीत नसल्याचा आरोप अधिकारी, कर्मचारी खाजगीत करीत आहेत. सिडको, चिकलठाणा, गारखेडा, मुकुंदवाडी, हडको येथे नगरसेवक स्वत: पाच वाजेपासून उठून नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा द्या, असे आवाहन करीत आहेत.सोमवारी सायंकाळी एमआयएममधील एका गटाने कचरा प्रश्नावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. ऐतिहासिक टाऊन हॉल येथे जमा केलेला कचरा उचलून वॉर्ड अधिकारी भालचंद्र पैठणे यांच्या कक्षात टाकण्यात आला. यावेळी सहायक आयुक्त विक्रम मांडुरके यांनी नगरसेवकांना बरेच समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगरसेवक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.एमआयएमची ही पद्धत चुकीचीकचरा प्रश्नावर एमआयएम मागील दीड महिन्यापासून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. शहरात एमआयएम नगरसेवकांच्या वॉर्डांमध्येच कच-याचा प्रश्न सर्वाधिक गंभीर आहे. नगरसेवक हे ट्रस्टी असतात. आपल्याच संस्थेची ही बदनामी करण्याची पद्धत चुकीची आहे. आजपर्यंत एमआयएमने कचरा प्रश्नात प्रशासनाला अजिबात सहकार्य केलेले नाही. मिटमिटा येथील दंगल असो किंवा सभागृहात प्रशासनावर बेछूट आरोप करून प्रसिद्धी मिळविण्याचा हा डाव असल्याचा आरोप महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला. एमआयएम नगरसेवकांना जनता कच-यामुळे त्रस्त आहे, हे दिसत नाही. टाऊन हॉलबाबत आजच एवढी सहानुभूती कोठून आली...? वॉर्ड कार्यालयात कचरा कोणी आणून टाकला याचा अहवाल सादर करावा, असे आदेश प्रशासनाला दिल्याचे त्यांनी नमूद केले.
वॉर्ड अधिकाऱ्याच्या कार्यालयात टाकला कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 1:43 AM