औरंगाबाद : शहरातील कचराकोंडीचा आज ६१ वा दिवस असून महापालिका प्रशासन या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्यास तयार नाही. बैठका, निविदा प्रक्रियेतच वेळ वाया घालविण्यात येत आहे. आजही शहरातील विविध वसाहतींमध्ये कचऱ्याला आग लावणे, मोठमोठे खड्डे करून कचऱ्याची विल्हेवाट लावणे सुरू आहे. या विरोधात नागरिकांच्या वतीने आज सकाळी पैठण गेट येथून गार्बेज वॉकचे आयोजन करण्यात आले.
विविध संघटना, नागरिक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पैठणगेट येथील स्व. गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्यापासून सकाळी ९.३० वाजता वॉकला सुरुवात झाली. गुलमंडी, रंगारगल्ली, बुढीलेनमार्गे वॉक महापालिकेवर धडकला. 'नागरिकांचा एकच जागर, स्वच्छ राखू आपल शहर' , शहर मे गंदगी परेशान जिंदगी' अशा आशयाची विविध बोर्ड सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मनपा कार्यालयात महापौर नंदकुमार घोडेले व अतिरिक्त आयुक्त यांनी नागरिकांशी चर्चा केली. ‘गार्बेज वॉक’ मध्ये आमदार सुभाष झांबड, व्यापारी महासंघाचे जगन्नाथ काळे, औरंगाबाद कनेक्ट टीमचे सारंग टाकळकर, लोकमतचे संपादक सुधीर महाजन, अमनसिंग पवार, समीर राजूरकर, प्रदीप पुरंदरे, श्रीकांत उमरीकर आदींचा सहभाग होता.
महिना अखेरीस शहर स्वच्छ नागरिकांच्या निवेदनावर बोलताना महापौर व अतिरिक्त आयुक्त यांनी शहरातील संपूर्ण कचरा ३० एप्रिल पर्यंत उचला जाईल असे आश्वासन दिले. यासोबतच मे महिन्या अखेरपर्यंत सर्व झोनमध्ये कचरा प्रक्रिया मशीन्स लावल्या जातील अशी माहिती दिली.