मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय मागील दोन दिवसांपासून जोरदार परिश्रम घेत आहेत. सभेसाठी महापालिका अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. समितीमधील अधिकाऱ्यांना वेगवेगळी कामे वाटून देण्यात आली आहेत. महापालिकेतील अधिकारी कर्मचारी दिवस-रात्र गरवारे क्रीडा संकुलावर थांबून काम करून घेत आहेत. गरवारे क्रीडा स्टेडियम ते जळगाव रोडपर्यंत मुख्य रस्त्यावरील सर्व खड्डे आज बुजविण्यात आले. याशिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली लहान-मोठी अतिक्रमणे काढण्यात आली. अतिक्रमणे काढल्यानंतर घनकचरा विभागाकडून स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले. गरवारे क्रीडा संकुलाच्या परिसरात असलेले गवत आणि इतर साहित्य आज वाहने लावून उचलण्यात आले. सभामंडपात ३०० निमंत्रित बसतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सोशल डिस्टंसिंगची विशेष खबरदारी या ठिकाणी घेण्यात आली असून, व्यासपीठावर मोजक्याच मान्यवरांना स्थान देण्यात आले आहे. सभेचे लाईव्ह प्रक्षेपण वृत्तवाहिन्यांसह सोशल मीडियावर करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी, महापालिका प्रशासक, पोलीस आयुक्त यांनी गरवारे क्रीडा संकुलाला भेट घेऊन संपूर्ण तयारीचा आढावा घेतला.
मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी गरवारे क्रीडा संकुल सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 4:24 AM