औरंगाबाद : नेवासा (जि. अहमदनगर) तालुक्यातील प्रवरा संगमजवळ सोमवारी मध्यरात्री आॅटोरिक्षाला लागलेल्या आगीत तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ‘गॅस कीट’असणारी रिक्षा, चारचाकी वाहने आरटीओ कार्यालयाच्या रडारवर आली आहेत. तपासणी मोहिमेतून ‘गॅस कीट’च्या वाहनांची तपासणी करून त्रुटी आढळून येणार्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
प्रवरा संगमजवळ अज्ञात वाहनाने हूल दिल्याने रिक्षा उलटली. त्यामुळे रिक्षातील एलपीजीचा स्फोट झाल्याचे समजते. अवघ्या काही मिनिटांत रिक्षा जळून खाक झाली. या घटनेमुळे गॅस कीटच्या वाहनांची परिस्थिती समोर आली आहे. पेट्रोल, डिझेलचे वाढते दर आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, इंधन खर्च कमी व्हावा, यासाठी शासनाने रिक्षा, चारचाकी वाहनांमध्ये एलपीजी (लिक्विड पेट्रोलियम गॅस) वापरास मान्यता दिली. त्यामुळे असंख्य वाहनचालकांनी याचा वापर सुरू केला. या वाहनांसाठी दर पाच वर्षांनी टाकीच्या क्षमतेची तपासणी करणे बंधनकारक आहे. परंतु औरंगाबादला ही सुविधा नसल्याने बहुतांशी वाहने तशीच धावत आहेत. त्यामुळे या वाहनांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गंभीर बनत आहे.
एलपीजीमुळे काही कालावधीनंतर टाकीची जाडी कमी होते. त्याकडे दुर्लक्ष केल्यास धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे दर पाच वर्षांनी नागपूर येथील मुख्य स्फोटक नियंत्रक (सीसीई) यांच्याकडून टाकीच्या सुरक्षिततेसंदर्भातील प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असल्याचे आरटीओ कार्यालयाकडून सांगण्यात येते. वाहनचालक हे चाचणी करण्याबाबत उदासीन आहेत. शहरातील सुमारे अडीच हजार रिक्षा आणि जवळपास १८४० चारचाकी वाहने गॅस कीटवर असल्याचे आरटीओ कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. यातील बहुतांश वाहने कोणत्याही तपासणीशिवाय रस्त्यांवर धावत आहेत. आरटीओ कार्यालयातर्फे गॅस कीटच्या वाहनांची तपासणी केली जाईल. प्रमाणपत्र असेल तरच वाहनांचे नूतनीकरण केले जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी सांगितले.
...असा होतो धोकाज्या वाहनात गॅस कीटची टाकी बसविली आहे, त्याठिकाणी ब्रेक वायरसारख्या इतर पार्टस्चे अनेकदा घर्षण होते. शिवाय गॅसमुळेही टाकीची जाडी कमी होते. या सगळ्याचा परिणाम म्हणून सिलिंडरची दाब क्षमता कमी होते. अशा वेळी गॅस गळती, स्फोट झाल्यास मोठी जीवित हानी होण्याचा धोका निर्माण होतो. अशा घटना टाळण्यासाठी आरटीओ कार्यालयाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.