: खोदकामानंतर रस्त्यालगत मलबा; वाहनधारकांचा जीव मुठीत धरून प्रवास
: खोदकामानंतर रस्त्यालगत टाकला मलबा; वाहनस्वारांचा जीव मुठीत धरून प्रवास
वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावरील पंढरपूर ते वाळूज दरम्यान गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम कासवगतीने सुरू आहे. यासाठी खोदकाम केल्यानंतर मलबा रस्त्यालगतच टाकण्यात येत असल्याने रहदारीस अडथळा होत असून, वाहनस्वारांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून हे काम मंदगतीने सुरू आहे. रात्री-अपरात्री जेसीबीने खोदकाम करण्यात येत असून, मलबा रस्त्यालगतच टाकण्यात येत आहे. मोठमोठे पाईप रस्त्याच्या कडेला टाकल्याने रस्ता अरुंद होऊन रहदारीस अडथळा झाला आहे. खोदकाम करताना काम सुरू असल्याचे सूचना फलक, बॅरिकेड्स तसेच विविध उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका बळावला आहे. पाऊस आल्यानंतर मलबा रस्त्यावर पसरतो व चिखल होतो आहे. चिखलावरून दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. रस्त्याच्या साईड पंख्यावर मलबा टाकल्याने ओव्हरटेक करणे जिकिरीचे झाले आहे.
कामामुळे या मार्गावरील वाहनाचे शोरूम, पेट्रोल पंपचालक, हॉटेल व इतर व्यावसायिकांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागते. अनेकजण राँग साईडने ये-जा करीत असल्याने अपघाताचा धोकाही बळावला आहे.
या मार्गावर दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. कामासाठी ये-जा करणारे दुचाकीस्वार कामगार तसेच कामगारांची ने-आण करणाऱ्या बस व इतर वाहनधारकांना रात्रीच्या अंधारात मलबा व पाईप दिसत नसल्याने किरकोळ अपघातही होत आहेत. हे काम गतीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
फोटो ओळ- अहमदनगर रोडवर पंढरपूर-वाळूज दरम्यान गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत असून, तो मलबा रस्त्यालगतच टाकण्यात येतो. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
------------------------------