करमाड : औरंगाबाद तालुक्यातील लाडगाव/हिवरा या ग्रुप ग्रामपंचायतमधील लाडगावमध्ये स्वयंपाकासाठी घरोघरी पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा केला जात आहे. हा अभिनव उपक्रम राबविणारी लाडगाव ही मराठवाड्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.
लाडगाव-हिवरा या ग्रुप ग्रामपंचायतमधील लाडगावमध्ये जवळपास चार महिन्यांपूर्वी भारत पेट्रोलियम कंपनीच्यावतीने घरोघरी पाइपलाइनद्वारे पी.एन.जी. गॅस पुरवठा योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. कंपनीच्या प्लांटपासून ते गावठाण हद्दीत पाइपलाइनचे काम पूर्ण झाले असून, या योजेनेचा लाभ घेण्यासाठी पाच हजार रुपये डिपॉझिट व एक हजार रुपये कनेक्शन जोडणी शुल्क अशा प्रकारे एकूण सहा हजार रुपयांत गॅस पुरवठा ग्रामपंचायतवासीय घेत आहेत. प्रत्येक घराच्या बाहेर गॅस वापराचे मीटर बसविण्यात आले आहे. सिलिंडरद्वारे खर्च होणाऱ्या गॅसपेक्षा जवळपास २० ते ३० टक्के आर्थिक बचत या योजनेतील लाभार्थ्यांची होणार असून, हा पी.एन.जी. गॅस स्फोट करीत नसल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडणार नसल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीचे पाऊल पडते पुढेआतापर्यंत ३१० कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पैसे भरले आहेत. यापैकी सुमारे २०० पेक्षा जास्त घरामध्ये प्रत्यक्षात पाइपलाइनद्वारे येणाऱ्या गॅसमधून स्वयंपाक बनविणे सुरू आहे. लाकडे आणणे किंवा सिलिंडर संपला नंबर लावण्याची कटकट टळली आहे.
घरोघर मातीच्या चुली नव्हे, तर आता गॅस शेगडीया गॅसमुळे ३० टक्के आर्थिक बचत होईल, शिवाय हा गॅस पाइपलाइनमध्ये कुठे लिकेज झाल्यास त्याचा स्फोट होणार नसल्याने यापासून कुठला धोकादेखील नाही. घरोघर मातीच्या चुली नव्हे, तर आता गॅस शेगडी बसविल्या जात आहे. गावातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.- सरपंच जयश्री गजानन बागल.