वाळूज महानगर : मेंदीपूर (ता. गंगापूर) येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोचा उद्रेक झाला आहे. गॅस्ट्रोची लागण झालेल्या सहा बालकांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात (घाटी) दाखल करण्यात आले आहे. घाटीत दाखल करण्यात आलेली बालके १ ते ५ वर्षे वयोगटातील आहेत. कार्तिक गायकवाड, जय पवार, आकाश बर्डे, सखू दळवी, प्रतिभा भामरे आणि लक्ष्मी भामरे अशी त्यांची नावे आहेत. मेंदीपूर येथे शेतवस्तीवर काही कुटुंबे वास्तव्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरूअसलेल्या पावसामुळे वस्तीला पाणीपुरवठा करणाऱ्या स्रोताचे पाणी दूषित झाले आहे. दूषित पाणी प्याल्याने सहा बालकांची तब्येत अचानक बिघडली. ग्रामस्थांनी ही माहिती १०८ रुग्णवाहिकेस दिली. डॉ. अमोल कोलते, वाहनचालक राजेंद्र उघडे व रवींद्र दाभाडे यांनी तातडीने मेंदीपूरला धाव घेतली. सुरुवातीला या बालकांना पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु तेथील डॉक्टरांनी घाटीत हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रात्री आठच्या सुमारास त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मेंदीपूरमध्ये गॅस्ट्रोचा उद्रेक
By admin | Published: July 08, 2016 11:42 PM