औरंगाबाद : छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या उद्रेकाचा मुद्दा बुधवारी थेट विधानसभेत गाजला. या प्रकरणात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल, असे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषित केले. त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपासून दोषींना अभय देणा-यांना चौकशी पूर्ण करून कारवाई करावी लागणार आहे.
छावणी परिसरात ११ नोव्हेंबर रोजी २५० पेक्षा अधिक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली. छावणी सामान्य रुग्णालयात तब्बल १२ दिवस गॅस्ट्रोच्या रुग्णांचा ओघ सुरू होता. रुग्णांची संख्या अवघ्या काही दिवसांत सहा हजारांवर पोहोचली. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना जलजन्य आजाराने विळखा घातल्याने आरोग्य विभागाच्या पायाखालची जमीनच सरकली. गॅस्ट्रोच्या उद्रेकाची राज्यभरात गंभीर नोंद घेण्यात आली.
छावणीत एक लाईन लष्करी भागासाठी, तर दुसरी लाईन नागरी वसाहतींसाठी आहे. एका नाल्यातून जलवाहिनी टाकण्यात आली. या जलवाहिनीला कोणतीही उंची देण्यात आली नव्हती. दोन दिवस ही लाईन बंद होती. याचदरम्यान लिकेजमधून दूषित पाणी आत गेले आणि छावणी भागातील शेकडो नागरिकांना ड्रेनेजच्या दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो झाल्याचे समोर आले. याप्रकरणी छावणी परिषदेचे उपाध्यक्ष संजय गारोल यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
पाच सदस्यांच्या या समितीकडून चौकशी केली जात आहे. कोणाचा हलगर्जीपणा झाला, गॅस्ट्रोच्या उद्रेकाला कोण जबाबदार आहे, त्याचा शोध घेतला जात आहे; परंतु समिती स्थापन होऊन पंधरा दिवस उलटले, तरीही चौकशी सुरूच आहे. या ना त्या कारणाने चौकशी लांबत असल्याने दोषींवर कारवाईच होत नाही. जाणीवपूर्वक चौकशी पूर्ण करण्याक डे दुर्लक्ष करून दोषींना अभय देण्यात येत असल्याचा आरोप होतो; परंतु हा विषय विधानसभेत पोहोचल्याने आता कुठे चौकशी पूर्ण होऊन दोषींवर कारवाई होईल, असे दिसते.
लवकरच चौकशी पूर्णचौकशी समितीची एक बैठक झाली आहे. काही जण गैरहजर राहत असल्याने चौकशी लांबली; परंतु आता आठवडाभरात चौकशी पूर्ण केली जाईल. पाणीपुरवठा, अभियंता, स्वच्छता विभागाची चौकशी करून हलगर्जीपणा दिसून आला, तर कारवाई केली केली जाईल. संबंधित जलवाहिनीची उंची वाढविण्यात आली आहे.- संजय गारोल, उपाध्यक्ष, छावणी परिषद