लोकमत न्यूज नेटवर्कसोयगाव : सोयगाव शहरासह गोंदेगाव, पळाशी परिसरात गॅस्ट्रोसदृश साथीने थैमान घातले असून तालुक्यात घबराट पसरली आहे. सोमवारी या तिन्ही गावातील जवळपास दोनशेच्यावर रुग्णांना उपचारासाठी विविध ठिकाणी दाखल करण्यात आले आहे.बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत मुख्य बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदेगाव, पळाशी उपकेंद्रात दुषित पाणी पिल्याने उलट्या, संडासचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. गोंदेगाव, पळाशी येथील १०० च्यावर रुग्णांना पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोंदेगावात पिण्याच्या पाण्यातून दुर्गंधी येत असल्याचेही नागरिकांनी सांगितले .पळाशी गावातही पिण्याचे पाणी दुषित आहे. या दोन्ही गावात बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक तळ ठोकून आहे. परंतु जिल्हा आरोग्य विभागाने या गावातील साथीची दखल घेतलेली नसल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. बनोटीला वैद्यकीय अधिकारीच नसल्याने रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याचे आरोप नागरिकांनी केले आहे. गोंदेगाव,पळाशीची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र असल्याने आरोग्य विभागात मोठा गोंधळ उडाला आहे.
गॅस्ट्रोसदृश्य साथीचे थैैमान
By admin | Published: July 11, 2017 12:16 AM