- रुचिका पालोदकर
१९५३-५४ च्या काळात बहराला आलेल्या मेळा संस्कृतीने शहरातील सांस्कृतिक चळवळीला नवे वळण दिले आणि अनेक कलाकार घडविले. लोकजीवनाचे समृद्ध दर्शन या मेळ्यांतून घडायचे. लोकजीवन खऱ्या अर्थाने समृद्ध करणारे ते संस्कारपीठ होते, असे मेळे बघणारे प्रत्यक्षदर्शी किंवा मेळ्यामध्ये काम केलेले अनेक कलाकार सांगतात. आजही गणेशोत्सव आनंदात, जल्लोषात साजरा होतो; पण या उत्साहाला मेळ्यांची सर नाही, अशी प्रतिक्रियाही काही जुनी-जाणती मंडळी देतात.
मेळ्यात काम केलेले काही कलाकार याबद्दल माहिती देताना सांगतात की, १९७० नंतर झपाट्याने बदलत गेलेल्या राजकीय परिस्थितीमुळे मेळेसंस्कृती बदलत गेली. गणेशोत्सवालाच हळूहळू राजकीय रूप येऊ लागल्यामुळे पैसा, सत्ता यांचे वर्चस्व मंडळात दिसू लागले आणि इथपासूनच मेळ्यांना उतरती कळा लागली.
सराफा परिसरातील सुवर्णकार मेळा, गुलमंडी परिसरातील मराठा हायस्कूलमधील झंकार मेळा, नवरंग, संगम, गणेश, वीर भारत आणि भीमदर्शन हे त्याकाळचे काही प्रसिद्ध मेळे होते. यापैकी भीमदर्शन मेळा आजही सुरू असून, मेळ्याचे हे ६८ वे वर्ष आहे. शहागंज, गुलमंडी या मुख्य चौकातील गणेश मंडळांमार्फत मेळ्यांचे संमेलन चालायचे. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी शाहगंज, गुलमंडी, चेलीपुरा, दानाबाजार, छावणी येथे मेळ्यांचे सादरीकरण व्हायचे. प्रत्येक मेळ्याला एक तासाचा वेळ दिला जायचा.
व-हाडकार लक्ष्मण देशपांडे, पं. राजा काळे, डॉ. रूपमाला पवार, संगीतकार गौतम आहेरकर, कल्पना आहेरकर, प्रा. डॉ. सुधीर जहागीरदार, विजया वर्मा, त्र्यंबक महाजन, खंडेराव तोडकर, रमेश जयस्वाल, मुरलीधर गोलटगावकर, बाळकृष्ण जोशी, बजरंगलाल शर्मा, रंगनाथ महिंद्रकर, भीमराव कुलकर्णी, वसंतराव कुलकर्णी, विनायकराव पाटील, गजल गायक शेख मुख्तार ही त्या काळी मेळ्यात काम करणारी काही प्रसिद्ध मंडळी होती. मेळे म्हणजे त्याकाळच्या लहान मुलांसाठी ‘ट्रेनिंग सेंटर’ असायचे. संगीत, नृत्य, नकला यापैकी मुलाला कशामध्ये कल आहे, हे पाहून मोठी मंडळी लहानग्यांना तयार करायची. कोणताही भेदभाव न करता सगळ्या जातींची, धर्माची मंडळी एकत्र येऊन मेळ्यांमध्ये समरस होऊन काम करायची. मेळे म्हणजे खऱ्या अर्थाने समरसतेचा रंगमंच होता, अशी भावनाही कलाकारांनी व्यक्त केली.
गणेश मेळ्याच्या आठवणी-त्याकाळी चालणाऱ्या मेळ्यांमुळे गणेशोत्सवाची मजा काही न्यारीच होती, असे भाऊसाहेब पुजारी यांनी सांगितले. औरंगपुरा परिसरात त्या क ाळी मोजके चार ते पाच गणपती असायचे. संपूर्ण शहरात मिळून १० ते १२ मेळे होते. भाऊसाहेब गजानन गणेश मेळ्यात तबला वादक म्हणून काम करायचे. याविषयी सांगताना ते म्हणाले की, साधारण एक महिना आधीपासून तालमीला सुरुवात व्हायची. नाथ मंदिराच्या भोवताली त्यावेळी पटांगण होते. या पटांगणातच तालमी चालायच्या. तबला, पेटी, बुलबुल तरंग, बासरी या वाद्यांच्या साह्याने मेळ्यात आम्ही गाणी सादर करायचो. गणेशोत्सवाच्या काळात रोज रात्री गाण्यांचे बहारदार सादरीकरण व्हायचे आणि सामान्य नागरिकांचाही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा.