कन्नड ( औरंगाबाद ) : गौताळा अभयारण्यातुन मौल्यवान खनिजाची तस्करी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सहा महिन्यातच अशा प्रकारच्या ही दुसरी घटना वन्यजीव विभागाला आढळून आली आहे.
दि.६ जुन २०२१ रोजी चाळीसगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत पाटणा परिक्षेत्रातील कक्ष क्र ३०३ मध्ये उत्खनन करणाऱ्या अरबाज पठाण रा.गराडा ता.कन्नड यास अटक करुन त्याच्या ताब्यातुन मौल्यवान खनिजाने भरलेले ६८ किलो वजनाचे १३ बॉक्स, उत्खनन करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारवाई वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शेळके, वनरक्षक राम डुकरे, अजय माहिरे, माधुरी जाधव, डीएस सोनार, लटपटे, चव्हाण, चाथे यांनी केली. न्यायालयाने आरोपीला ९ जुनपर्यंत वनकोठडी दिली असून आरोपीच्या ९ साथीदारांचा शोध सुरु आहे. यापूर्वी वनउपज व मौल्यवान दगड चोरल्याच्या गुप्त माहिती आधारे २३ जानेवारी २०२१ रोजी छापा टाकुन वन्यजीव विभागाने गराडा येथील चार आरोपींच्या घरातुन ३०१ किलो मौल्यवान दगड,सफेद मुसळी ५ किलो १५ ग्रॅम,धामोडी डिंक ६ किलो ८४ ग्रॅम,टिकाव,कुदळ,छन्या,टॉमी,करवत आदी साहित्य जप्त करून चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केलेला आहे.
तालुक्याचेच नव्हे तर जिल्ह्याचे वैभव असलेल्या गौताळा अभयारण्याला तस्करांची द्दष्ट लागली आहे. तस्करांनी अभयारण्यातील चंदन वृक्षाची विल्हेवाट लावली असुन त्यांची नजर आता मौल्यवान खनिजाकडे वळली आहे. नैसर्गीक असलेल्या डोंगरातुन उत्खनन करून तस्करांनी मौल्यवान खनिजाची तस्करी सुरु केली आहे. मराठवाडा आणि खान्देशच्या सीमेवर २६० चौ.किमी. क्षेत्रफळावर डोंगररांगावर नैसर्गिक वनराईने नटलेले गौताळा अभयारण्य आहे. अभयारण्यात विविध प्राण्यांच्या प्रजातीबरोबरच मोठ्या प्रमाणात वनौषधी आहे. चंदन, साग यासारखे मौल्यवान वृक्षही आहेत. मात्र, त्यापैकी लाकडांसाठी चंदनाच्या झाडांची तस्करांनी कत्तल केली आहे. आतातर मौल्यवान खनिजांची चोरी करण्याकडे तस्करांनी मोर्चा वळवला आहे.