औरंगाबाद : तीन महिन्यांपूर्वी घेतलेले क्रेडिट कार्ड न वापरल्यामुळे आता ते रद्द करत आहोत. कार्डवरील इन्शुरन्स प्रॉडक्टसाठी तीन हजार रुपये आकारण्यात आले आहेत. कार्ड रद्द करण्यासाठी त्याची माहिती पाठवा म्हणत भामट्याने घाटीतील परिचारकाच्या खात्यातील १ लाख १ हजार २९८ रुपये लांबवले. हा प्रकार ८ डिसेंबर २०२१ रोजी घडला. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुधीर घुले हे घाटीत परिचारक आहेत. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी आयसीआयसीआय बँकेचे एजंटकडून क्रेडिट कार्ड घेतले होते. त्यानंतर ८ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी घुले यांना फोन आला. त्यावेळी आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड कस्टमर केअर सेंटरमधून बोलतोय, असे सांगितले. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून कार्ड वापरलेले नाही. तुम्हाला काही अडचण आहे का, अशी विचारणा केली. तेव्हा घुलेंनी आतापर्यंत कार्ड वापरले नसल्याचे सांगितले. त्यावर त्याने कार्ड रद्द करण्यासंदर्भात फोन केला आहे. तुमच्या क्रेडिट कार्डवर इन्शुरन्स प्रॉडक्टस म्हणून तीन हजार रु. आकारल्याचे सांगितले.
घुलेंनी इन्शुरन्स प्रॉडक्टस घेण्यास नकार दिला. तेव्हा भामट्याने इन्शुरन्स प्रॉडक्टस रद्द करण्यासाठी क्रेडिट कार्डची माहिती पाठवा असे सांगितले. त्यामुळे घुलेंनी त्याच्यावर विश्वास ठेवून कार्डसंदर्भातील सर्व माहिती पाठवली. घुलेंनी मोबाईलवर आलेला ओटीपी भामट्याला पाठवताच त्यांच्या खात्यातून एक लाख एक हजार २९८ रुपये कमी झाले. त्यानंतर त्यांचे कार्ड देखील ब्लॉक झाले. या घटनेनंतर मंगळवारी घुले यांनी बेगमपुरा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार करत आहेत.